हल्ला करून लुटले, जाताना घरात कोंडले; चोरट्यांचा धुडगूसात माय-लेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 01:39 PM2022-06-24T13:39:15+5:302022-06-24T13:41:08+5:30

चोरट्यांनी रॉड व सुऱ्याने माय-लेकावर डोक्यात व हातावर हल्ला केला.

Robbed by attack, locked in the house on the way; Thieves attack Mahakunde settlement | हल्ला करून लुटले, जाताना घरात कोंडले; चोरट्यांचा धुडगूसात माय-लेक गंभीर जखमी

हल्ला करून लुटले, जाताना घरात कोंडले; चोरट्यांचा धुडगूसात माय-लेक गंभीर जखमी

Next

बीड : शहराजवळील तळेगाव शिवारातील महाकुंडे वस्तीवर चोरट्यांनी धुडगूस घालून हल्ला चढवत माय-लेकास लुटले. त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून चोरटे पसार झाले. ही घटना २३ जूनला पहाटे अडीच वाजता घडली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कडी उघडली व दोन्ही जखमींना शासकीय वाहनांतून रुग्णालयात दाखल केले.

तळेगाव शिवारात महाकुंडे वस्ती आहे तेथे अनिता चंद्रकांत गायकवाड (४२) या वास्तव्यास आहेत. २३ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराची कडी वाजवली. अनिता यांचा मुलगा संदेश (२४) याने खिडकीतून पाहिले असता बाहेर तीन चोरटे असल्याचे आढळले. त्यामुळे त्याने दरवाजा उघडला नाही. यावेळी चोरट्यांनी मागील बाजूचा दरवाजाचे कुलूप कटावणीच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. सुरा व लोखंडी रॉडचा धाक दाखवून कपाट उचकटले. मात्र, त्यात काहीच आढळले नाही. त्यामुळे तिन्ही चोरटे चिडले. त्यापैकी एकाने रॉड व सुऱ्याने माय-लेकावर डोक्यात व हातावर हल्ला केला. त्यानंतर अनिता यांच्या गळ्यातील १४ हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र हिसकावले. पळून जाताना बाहेरून कडी लावून घेतली. त्यामुळे माय-लेक घरातच कोंडले गेले. त्यांनी पोलिसांना संपर्क केला.

बीड ग्रामीण ठाण्याचे पो. नि. संतोष साबळे, सहायक निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक पवन राजपूत, देवीदास आवारे यांनी तेथे धाव घेतली. कडी उघडून दोन्ही जखमींना बीडमधील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. संदेश चंद्रकांत गायकवाड याच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलीस अधीक्षकांची भेट
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सकाळी सात वाजता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी घटनास्थळी पाहणी केली. उपअधीक्षक संतोष वाळके, गुन्हे शाखेचे पो. नि. सतीश वाघ यांनीही भेट दिली.

चोरट्यांचा शोध सुरू
घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनी भेट दिली. संशयित चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचे काम सुरू आहे. चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले.

बीडमध्ये पोलिसाचे घर फोडण्याचा प्रयत्न
दरम्यान, २३ जूनला पहाटे बीडमधील अंकुशनगरातील सोमेश्वर नगरात चोरट्यांनी २३ रोजी पहाटे धुडगूस घालून एका पोलीस अंमलदाराच्या घराची कडी उचकटली. तेथे केवळ प्रयत्न झाला. त्यामुळे बीड ग्रामीण ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

Web Title: Robbed by attack, locked in the house on the way; Thieves attack Mahakunde settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.