दरोडेखोरांचा म्होरक्या पोलिसांना म्हणतो, अजय देवगण माझा भाऊ अन् माधुरी दीक्षित बहीण
By सोमनाथ खताळ | Published: March 9, 2024 06:52 PM2024-03-09T18:52:41+5:302024-03-09T18:54:34+5:30
सचिन भोसले हा कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीचा म्हाेरक्या असून तपासात पोलिसांची दिशाभूल करत आहे
बीड : बीड पोलिसांच्या डोळ्यात चटणी टाकणाऱ्या सचिन ऊर्फ सच्या ईश्वऱ्या भोसले (वय २७, रा.नागझरी, ता.गेवराई) याला बेड्या ठोकल्या होत्या. ताे भोसले गँगचा म्होरक्या आहे. त्याची चौकशी केली असता तो तपासात कसलेही सहकार्य करत नाही. एवढेच नव्हे तर खोटी माहिती सांगून दिशाभूल करत आहेत. त्याने अजय देवगण भाऊ, तर माधुरी दीक्षित बहीण असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याला काहीही विचारले की तो अभिनेता, अभिनेत्री, राजकीय नेत्यांची नावे घेऊन ते नातेवाईक असल्याचे सांगत आहे.
ईश्वऱ्या भोसले हा मूळचा आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील रहिवासी; परंतु नंतर तो अहमदनगर येथे स्थलांतरित झाला. तो कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला चार बायका आणि तब्बल २७ मुले आहेत. त्यातीलच एक सच्या आहे. ईश्वऱ्या सध्या मयत असून, त्याची मुले राज्यात धुमाकूळ घालत आहेत. काही दिवसांपूर्वीच सच्याचा भाऊ आटल्या याला आष्टी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर काही दिवस ही गँग शांत राहिली; परंतु नंतर पुन्हा ती ॲक्टिव्ह झाली.
हीच माहिती समजल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गेवराई तालुक्यातील नागझरी येथे पोहोचले. सच्याला अटक करताना तेथील महिलांनी पोलिसांवर हल्ला केला. काहींनी डोळ्यात चटणी टाकून लाकडी दांड्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी सुटका करत तेथून काढता पाय घेतला. दुसऱ्याच दिवशी यातील सच्या आणि त्याची बायको व सासूला बेड्या ठोकल्या. सच्याकडून १० गुन्हे उघड झाले होते, तसेच त्याच्याकडून तब्बल १० तोळे सोने हस्तगत केले होते. आता सर्वच गुन्ह्यांत फिरत आहे. एका पोलिस ठाण्यात त्याची चौकशी सुरू असताना त्याने पोलिसांची चांगलीच दिशाभूल केली. नातेवाइकांची नावे विचारल्यावर मराठी, हिंदी अभिनेता, अभिनेत्री यांची नावे तो सांगत आहे. तो सराईत असल्याने पाेलिसांना तपासात कसलेही सहकार्य करत नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
बायकोसाठी काही पण...
सच्याची बायको आर्ची हिच्यावरदेखील सध्या पोलिसांवर हल्ला केला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे; परंतु आर्चीला सोन्याच्या दागिन्यांची खूप हौस आहे. तिच्यासाठीच सच्या घरफोडी, चोऱ्या जास्त करायचा. चोरलेले सोने आर्चीच्या गळ्यात घालून नंतर ते फोटोसेशन करत असत.
बापालाही म्हणतो, हा कोण?
सच्याचा बाप ईश्वऱ्या हा कुख्यात गुन्हेगार होता. तो सध्या मयत आहे; परंतु एका गुन्ह्यात या ईश्वऱ्या आणि सचिन या दोघांनाही अटक केली होती. दोघांना बाजूला बसविले. सचिनला ईश्वऱ्याबद्दल विचारले, तर तो म्हणायचा मी याला ओळखत नाही. माझा बाप दुसराच आहे. ईश्वऱ्यानेही सचिनची ओळख दाखवली नव्हती. त्यावरून हे गुन्हेगार पोलिसांना कसलीच माहिती देत नसल्याचे दिसून येते. हा किस्सा आजही एलसीबीत चर्चेत आहे.