पोलीस ठाण्यातून पळालेला दरोडेखोर १६ तासांत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:35 AM2021-09-03T04:35:10+5:302021-09-03T04:35:10+5:30
बीड/अंबाजोगाई : सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत दरोडेखोराने अंबाजोगाई शहर ठाण्यातून धूम ठोकली होती. १ सप्टेंबर रोजी रात्री ...
बीड/अंबाजोगाई : सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत दरोडेखोराने अंबाजोगाई शहर ठाण्यातून धूम ठोकली होती. १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला होता. मात्र, १६ तासांनंतर त्यास पुन्हा बेड्या ठोकण्यात पाेलिसांना यश आले. केजमध्ये २ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्यास ताब्यात घेण्यात आले.
समाधान वैरागे (३२, रा. जवळबन, ता. केज) असे त्या आरोपीचे नाव आहे. २०१६ मध्ये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंपावर दरोडा पडला होता. या गुन्ह्यात समाधान सहभागी होता. तेव्हापासून तो फरार होता. दरम्यान, तो जवळबन येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून १ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार कैलास ठोंबरे, रामदास तांदळे, अशोक दुबाले, शेख नसीर व सखाराम पवार यांचे पथक रवाना केले. या पथकाने दिवसभर पाळत ठेवून सायंकाळी समाधान वैरागे याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, वैद्यकीय तपासणी करून त्यास अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पथक निघून आले. ठाणे अंमलदाराच्या खुर्चीजवळ बसलेल्या समाधान वैरागे याने पोलीस कामात व्यस्त असल्याची संधी साधत रात्री साडेआठ वाजता ठाण्यातून पलायन केले. तो पळून गेल्याने ठाण्यात एकच गोंधळ उडाला. शहर ठाण्यात रात्री समाधान वैरागेवर ठाण्यातून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच्या शोधार्थ अंबाजोगाई शहर व गुन्हे शाखेचे पथक रवाना केले होते.
...
पथके पुण्याला आरोपी केजमध्ये
समाधान वैरागे हा पुण्याला पळून गेल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ व अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब वाघ यांनी पथके पुण्याला रवाना केली होती. मात्र, तो केजमध्ये एका गॅरेजमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर अंबाजोगाई शहर ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक कांदे व सहकाऱ्यांनी त्यास तेथून २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ताब्यात घेतले.
....
020921\02bed_10_02092021_14.jpg
समाधान वैरागे