नवीन भाटवडगाव वसाहतीत चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:40 AM2021-02-17T04:40:32+5:302021-02-17T04:40:32+5:30
माजलगाव : शहरातील दक्षिणेकडील नवीन भाटवडगाव वसाहतीला लागून असलेल्या संत ज्ञानेश्वरनगर येथे चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करण्यात ...
माजलगाव : शहरातील दक्षिणेकडील नवीन भाटवडगाव वसाहतीला लागून असलेल्या संत ज्ञानेश्वरनगर येथे चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करण्यात आली. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
नवीन भाटवडगाव ज्ञानेश्वरनगर भागात राहणारे अंकुश विठ्ठल कळसे यांच्या घरी मंगळवारी पहाटे ४ वाजेदरम्यान चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची घटना घडली. यात ४३ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला.
अंकुश कळसे हे सोमवारी रात्री जेवण करून रात्री ११ वाजेच्या सुमारास झोपी गेले असता पहाटे ४ वाजेदरम्यान त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. झालेल्या आवाजाने कळसे यांना जाग आली. दरम्यान, चोरट्यांनी त्यांना चाकू व कत्तीचा धाक दाखवीत कपाटाच्या चाव्या विचारून माल कुठे आहे अशी विचारणा केली. कपाटातील सोन्याच्या दोन अंगठ्या, पत्नीच्या गळ्यातील नेकलेस, सोन्याचे मंगळसूत्र, मिनी गंठण, खिशातील नगदी ४ हजार रुपये, असे मिळून एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शिक्षक असलेल्या कळसे यांना धमकावताना चोरटे हे हिंदी भाषेतून बोलत होते. त्यांचे वय २० ते २२ असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी माजलगाव पोलिसांत अज्ञात ४ चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयराम भटकर करीत आहेत.