केज शिवसेना तालुकाप्रमुखांच्या घरी धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:03 PM2018-11-12T17:03:43+5:302018-11-12T17:19:52+5:30
केजचे शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या अयोध्या नगर मधील घरी धाडसी चोरी झाली.
केज (बीड ) : केजचे शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या अयोध्या नगर मधील घरी धाडसी चोरी झाली. आवाजाने त्यांची पत्नी उठली आणि चोरट्यांना प्रतिकार केला. याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून घेत पळ काढला. हा प्रकार रविवारी रात्री घडला. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
केज येथील शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या घरी दिपावलीनिमित्त नातेवाईक आले होते. त्यातच रत्नाकर शिंदे हे बाहेरगावी गेल्याची संधी साधुन त्यांच्या अयोध्या नगरातील घराच्या खिडकीची लोखंडी जाळी काढुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्या ठिकाणी त्यांची पत्नी व मुलगा झोपलेले होते. घरात शिरकाव केलेल्या चोरट्याने हातातील बॅटरी लावत घरातील सामानाचा अंदाज घेतला. यावेळी बॅटरीचा प्रकाश मंजुषा शिंदे यांच्या डोळ्यावर चमकल्याने त्यांना जाग आली. त्यांनी घरातील कोणी असेल म्हणून कोण आहे, अशी विचारणा केली.
याचवेळी चोरट्यांनी त्यांना गप्प बस, असा दम दिल्याने त्यांनी बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. मंजुषा शिंदे यांनी सर्व ताकद एकवटून चोरट्यास ढकलून दिल्याने चोरटा खाली पडला. त्याच वेळी शिंदे यांनी घराचे दार उघडून घरच्यांना आवाज दिला असता एका चोरट्याने धक्का देत त्यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून घेत पळ काढला.
घटनेची माहिती समजताच पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी सर्व तपासणी केली मात्र हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी मंजुष शिंदे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार डोंगरे हे करत आहेत.