खडकतमध्ये मांसाने भरलेला टेम्पो जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:01 AM2019-02-02T00:01:41+5:302019-02-02T00:02:08+5:30
बीड : जनावरांचे मांस भरून घेऊन जाणारा एक टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला. तसेच दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ...
बीड : जनावरांचे मांस भरून घेऊन जाणारा एक टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला. तसेच दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता आष्टी तालुक्यातील खडकत येथे केली.
खडकत येथे सर्रास जनावरांची कत्तल करून मांस दुसऱ्या राज्यात पाठविल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यापूर्वीही अनेकदा या कत्तलखान्यावर धाड टाकून लाखो रूपयांचे मांस जप्त केले होते.
तसेच अनेक जनावरांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतरही हा कत्तलखाना सुरूच राहिला. पुन्हा या कत्तलखान्यातून एका टेम्पोमधून मांस विक्रीसाठी बाहेर नेले जात असल्याची माहिती पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांना मिळाली.
त्यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना माहिती देऊन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित यांना सोबत घेऊन पथकाने सायंकाळी पाच वाजता खडकत गाठले. मांसाने पूर्ण टेम्पो भरला जात असल्याचे त्यांना दिसले. अचानक धाड टाकून त्यांनी टेम्पो आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले. सायंकाळपर्यंत याची आष्टी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रोशन पंडित, पोउपनि रामकृष्ण सागडे, गणेश नवले, अंकुश वरपे, पांडुरंग देवकते, रेवननाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली.