बीडमध्ये असाही ‘रोझ डे’; गुलाबऐवजी लोकसहभागातून ‘दामिनी’पथकाला दुचाकी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 04:57 PM2019-02-07T16:57:17+5:302019-02-07T16:59:09+5:30
प्रत्येक तालुक्यातून एक दुचाकी पथकाला भेट देण्यात आली.
- सोमनाथ खताळ
बीड : व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे. गुरूवारी रोझ डे होता. या दिवशी गुलाब दिला जातो. मात्र बीडमधील दानशुरांनी गुलाब देण्याऐवजी छेडछाड रोखण्यासाठी नियूक्त केलेल्या दामिनी पथकाला दुचाकींची भेट दिली आहे. बीडमध्या असाही रोझे डे साजरा केल्यानंतर याची चर्चा दिवसभर शहरात होती. बीड पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम राज्यात अव्वल राहणार आहे. याच दुचाकीवरून दामिनी पथके आता जिल्हाभर गस्त घालणार असल्याने महिला, मुलींमधून समाधान व्यक्त होत आहे.
शाळा, महाविद्यालयात जाताना रस्त्यावर उभा राहून किंवा पाठलाग करून रोडरोमिओ मुलींची छेड काढतात. तसेच रात्री, अपरात्री एकटी महिला, मुलगी पाहून तिला टाँट मारणे, अश्लिल भाषा वापरणे, छेड काढण्यासारखे प्रकार केले जातात. हाच धागा पकडून जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची नियूक्ती केली. जिल्हाभर जनजागृतीसह छेड काढणाऱ्या रोमिओंना पकडून चोप दिला. आता यामध्ये आणखी सुधारणा व्हावी, मुलींमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी प्रत्येक पथकाला एक दुचाकी देण्याची संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी व्यक्त केली. याला बीडकरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक तालुक्यातून एक दुचाकी पथकाला भेट देण्यात आली. याचे वाटप गुरूवारी करण्यात आले.
इकडे गुलाब देऊन तरूणाची प्रेमाचा ‘इजहार’ करीत होते, तर दुसऱ्या बाजूला पोलीस आणि नागरिकांनी एकत्र येत आदर्श उपक्रम हाती घेतला. अपर पोलीस महासंचालिका डॉ.प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते या दुचाकींचे वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते बीड पोलिसांनी काढलेल्या कादर्शीकेचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जालनाचे अधीक्षक एस.चैतन्य, उस्मानाबादचे अधीक्षक आर.राजा, औरंगाबाद ग्रामीणच्या अधीक्षिका आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, भास्कार सावंत, श्रीकांत डिसले, पोनि घनश्याम पाळवदे, राजीव तळेकर, भाऊसाहेब पाटील, पोउपनि भारत माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.प्रशांत जोशी यांनी केले.
जॅकेट अन् कॅमेऱ्यांमुळे वेगळी ओळख
प्रत्येक पथकाच्या कर्मचाऱ्याला पेट्रोलिंग जॅकेट दिले तसेच शिवाय बॉडीआॅन कॅमेराही दिला आहे. कॅमेऱ्यातच जीपीएस सिस्टीम कार्यान्वीत असल्याने कॅमेरा बंद केला किंवा काही गैरप्रकार झाला तर थेट नियंत्रण कक्षात समजणार आहे. तसेच कर्मचारी कोठे आहेत, काय करतात, कॅमेऱ्यात काय रेकॉर्ड सुरू आहे, याची सर्व ‘लाईव्ह’ माहिती नियंत्रण कक्षात बसून पाहता मिळणार आहे.
बीड पोलिसांचे उपक्रम कौतुकास्पद
बीड पोलिसांनी राबविलेले उपक्रम हे कौतुकास्पद आहेत. त्यात दुचाकी, कॅमेऱ्यांमुळे आणखी एक भर पडली आहे. असे उपक्रम इतर ठिकाणीही राबविले जावेत, यासाठी प्रयत्न करू. आयजी आणि एसपींचे मी स्वागत करते.
- डॉ.प्रज्ञा सरवदे, अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य