भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने कोबी, टोमॅटो, पिकावर फिरवला रोटावेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:03 AM2021-02-06T05:03:51+5:302021-02-06T05:03:51+5:30
नांदुरघाट (जि. बीड) : भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने परिसरातील सहा ते सात शेतकऱ्यांनी कोबी, टोमॅटो पिकावर रोटावेटर फिरवला. दोन रुपये ...
नांदुरघाट (जि. बीड) : भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने परिसरातील सहा ते सात शेतकऱ्यांनी कोबी, टोमॅटो पिकावर रोटावेटर फिरवला. दोन रुपये किलोनेही कोबी आणि टोमॅटोला बाजारात कुणी विचारत नव्हते. उत्पन्न तर सोडाच काढणी आणि लागवडीचा खर्चही निघत नाही, ही शेतकऱ्यांची व्यथा होती.
शेतकरी समाधानी असे कधी झालेच नाही. कारण कायम संकट व संघर्ष हे पाचवीला पुजले आहेत. थोड्याफार क्षेत्रावर भाजीपाला उत्पन्न करून त्यावर उदरनिर्वाह करणारे बहुतांश शेतकरी आहेत. रोप लावल्यापासून पोटच्या लेकरावाणी पिकाची काळजी घ्यायची, लेकराला बिस्कीट पुडा घेताना दहा वेळेस विचार करणारा शेतकरी शेतात कीटकनाशकाची बाटली बेभाव किमतीत घेऊन फवारणी करतो. शेतामध्ये रात्रभर पाणी देण्यासाठी जिवाची पर्वा न करता उभा राहतो. शेतामधील आलेले तण नवरा - बायको दिवस रात्र कष्ट करून मशागत करतात. शेवटी पीक आल्यावर बाजारभाव नाही सापडल्यावर हताश होऊन कर्माला दोष देत आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. अशी वेळ येते हमीभाव नसल्यामुळे. कारण शेतकऱ्याला त्याच्या मालाला काय किंमत येईल, याची हमीच नसते. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे.
नांदुरघाट व सर्कलमध्ये अनेक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. याचे कारण शेतीमध्ये नापिकी व उत्पादित केलेल्या मालाला किंमत नाही. नांदुरघाट व परिसरात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. थोड्या फार एकर, दोन एकर शेतीमध्ये भाजीपाला करून मंगळवारी आठवडी बाजारात विकून आपला प्रपंच चालवायचा. या भागात पत्ताकोबी व टोमॅटो याची लागवड चांगल्या प्रकारे झाली होती. परंतु बाजारामध्ये कोबीला दोन रुपये किलोसुद्धा भाव नाही. तसेच टोमॅटोचा दहा किलोचा कॅरेट वीस रुपयाला झाल्याने हा माल तोडून बाजारात येण्यासाठी त्याच्या गावातून त्याचे वैयक्तिक तिकीटसुद्धा निघत नाही. त्यामुळे या भागातील बळीराजा हताश झाला आहे.
पवारवाडी येथील विकास सोळुंके यांनी अर्धा एकर कोबी व अर्धा एकर टोमॅटो लावले होते. परंतु आलेले पीक तोडण्यासाठी जी मजुरी लागते ती ५० टक्केसुद्धा निघत नाही, झालेला खर्च तर वेगळाच. त्यामुळे हताश झालेल्या विकास सोळुंके या शेतकऱ्यासह परिसरातील सहा ते सात शेतकऱ्यांनी उभ्या पिकामध्ये रोटावेटर फिरवून पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेेले पीक जमीनदोस्त करताना कंठ दाटून डोळ्यात अश्रू येत होते. अशी परिस्थिती उद्भवते म्हणूनच शेतकरी नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. अशा शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने पंचनामे करून त्या शेतकऱ्याला पुढच्या पिकासाठी किमान बियाणे व खत मोफत देऊन आधार द्यायला पाहिजे. कष्ट करण्याची तयारी आहे. परंतु आर्थिक घडी बिघडल्यावर शेतकरी हताश होतो. त्यामुळे परिसरातील टोमॅटो व कोबी उत्पादक शेतकरी हे ‘जे आहेत त्यांचा पंचनामा करून मदत द्यावी’, असे बोलत आहेत. विकास सोळुंके यांनी तीन महिने राब राब राबून पिकविलेला पूर्ण भाजीपाला रोटावेटर फिरवून जमीनदोस्त केला, कारण काढणीसाठीचे पैसेसुद्धा निघत नव्हते.