बीडमध्ये कारमधून ३० लाख रूपये पकडले; सलग दुसऱ्या दिवशी मोठी रक्कम हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 05:49 PM2019-04-09T17:49:35+5:302019-04-09T17:51:57+5:30
सलग दुसऱ्या दिवशी दोन कारवाया झाल्या.
बीड : सोमवारी ४० लाख रूपयांची रक्कम पकडल्यानंतर मंगळवारी बीड बसस्थानकासमोर आणखी ३० लाख रूपये एका कारमधून जप्त केले. सलग दुसऱ्या दिवशी दोन कारवाया झाल्या. बीड शहर वाहतूक शाखेने ही कारवाई केली.
बीड बसस्थानकासमोर मंगळवारी सकाळी वाहतूक शाखेचे कर्मचारी व्ही.आर.आघाव हे वाहनांची तपासणी करीत होते. याचवेळी एक कार (एमएच २० बीसी ३३१९) ही कार त्यांनी अडवली. तपासणी केली असता यामध्ये एक पोते दिसले. पाहणी केल्यावर यात रोख रक्कम असल्याचे दिसले. त्याप्रमाणे तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला माहिती देण्यात आली. त्यांनी धाव घेतली. त्यानंतर मोजणी केली असता ३० लाख रूपये असल्याचे समजले.
दरम्यान, या कारमध्ये महादेव जाधव व गणेश मस्के असे दोन व्यक्ती आढळून आले. या सर्व घटनेचा अहवाल तयार करून निवडणुक विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम बँकेचे असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रशासनाकडून याला अधिकृतरित्या दुजोरा मिळाला नाही.