बीडमध्ये ५५ लाखांचा धान्य घोटाळा; तीन गोदाम व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 01:27 PM2019-03-14T13:27:10+5:302019-03-14T13:47:31+5:30
याच प्रकरणातील चौकशीचा अहवाल बाजूने देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.
बीड : बीडच्या शासकीय धान्य गोदामातून १४ हजार ६८७ क्विंटल धान्य काळ्या बाजारात विक्री करून तब्बल ५५ लाख रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन तीन गोदाम व्यवस्थापकांवर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणातील चौकशीचा अहवाल बाजूने देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.
अतुल अरविंद झेंड, संजय नारायण हांगे व नितीन तुकाराम जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन गोदाम व्यवस्थापकांची नावे आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी हरीश्चंद्र गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शासकीय धान्य गोदाम आहे. या गोदामात २० फेब्रुवारी २०१८ रोजी व्यवस्थापकांच्या अहवालातून १४ हजार ६८७ क्विंटल धान्याची तफावत बीड तहसीलदारांना आढळली. त्यांनी हा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला. त्याप्रमाणे २४ मार्च २०१८ रोजी पुरवठा विभाग, औरंगाबादच्या उपायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी २८ मार्च २०१८ ला अपर जिल्ह्याधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी २९ आॅक्टोबर २०१८ रोजी या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच जणांचे पथक नियुक्त केले.
या पथकाने चौकशी करून अहवाल अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यामध्ये ५५ लाख ३ हजार ५०९ रूपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी त्याचे अवलोकन केले, मात्र निर्णय झाला नव्हता. १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावर निर्णय घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे गवळी यांनी बीड ग्रामीण ठाणे गाठून तत्कालीन तीन गोदाम व्यवस्थापकांविरोधात फिर्याद दिली. त्याप्रमाणे फसवणूक व इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे करत आहेत.
असा केला अपहार
तत्कालीन गोदाम व्यवस्थापक अतुल अरविंद झेंड व संजय नारायण हांगे यांनी डिसेंबर २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत १५५८ क्विंटल धान्य (किंमत ३८ लाख ७ हजार ३५७ रूपये), संजय हांंगे यांनी याच कालावधीत साखरेच्या मूळ परमिटची एकापेक्षा अधिक वेळा नोंद करून ५७३.४४ क्विंटल साखरेचा (किंमत १४ लाख ७ हजार ७७७ रूपये) घोटाळा केला. याच कालावधीत नितीन तुकाराम जाधव यांनी ३ आॅक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ११२.०५ क्विंटल (किंमत २३ लाख ८ हजार ३७४ रूपये) धान्याचे मुळ धान्य परमिट
एकापेक्षा अधिक वेळा वापर करून अपहार केला.
धान्यमाफियांची साखळी सक्रिय
शासकीय धान्य गोदामातून गरिबांसाठी आलेले धान्य काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची साखळी आहे. काहीही घोटाळा झाला की चौकशी अधिकारी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करतात. धान्यमाफियांची एक साखळी बीड जिल्ह्यात सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. गरिबांना उपाशी ठेवून धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार यावरून स्पष्ट झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कांबळे एसीबीच्या जाळ्यात
याच प्रकरणाची चौकशी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्याकडे होती. त्याचा अहवाल गोदाम व्यवस्थापकांच्या बाजूने देण्यासाठी कांबळेंनी ५ लाख रूपयांची लाच मागितली होती. याचवेळी एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले होते.