आरटीओ कार्यालयातील कामे झाली ऑनलाईन; १०० किलोमीटरचा हेलपाटा वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:36 AM2021-08-19T04:36:50+5:302021-08-19T04:36:50+5:30
रिॲलिटी चेक/ अविनाश मुडेगावकर/ अंबाजोगाई : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील बहुतांश कामे आता ऑनलाईन झाली आहेत. त्यामुळे ...
रिॲलिटी चेक/
अविनाश मुडेगावकर/
अंबाजोगाई : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील बहुतांश कामे आता ऑनलाईन झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत. एजंटांकडून कामे करून घेण्याची आता गरज नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परिवहन विभागाने आता काही चांगले धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. नागरिकांना कमीत कमी वेळात वाहनासंबंधीची कागदपत्रे उपलब्ध होतील, यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे. वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी ऑनलाईन करता येत आहे. त्याशिवाय मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना ऑनलाईन कर भरण्याची सुविधा सुरू झाली आहे. सर्व नव्या वाहनांची नोंदणी प्रक्रिया वाहनांच्या शोरूमव्दारेच केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये येण्याची आता कोणतीही गरज राहिलेली नाही. अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत अंबाजोगाई, परळी, धारूर, केज, माजलगाव या तालुक्यांचा समावेश आहे. माजलगाव ते अंबाजोगाई हे १०० किलोमीटरचे अंतर आहे. ऑनलाईन कामकाज सुरू झाल्याने दूरच्या अंतरावरील गावच्या नागरिकांचे काम घरी बसून होऊ लागले. वेळ व पैसा यांचीही बचत झाली.
...
युवक घेतात ऑनलाईन सुविधेचा लाभ
परिवहन कार्यालयामार्फत होणारी बहुतांश कामे आता ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहेत. लर्निंग लायसन व इतर सुविधा ऑनलाईन होत असल्याने १०० किलोमीटर अंतरावरील कामेही घरात बसून होऊ लागली आहेत. युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊ लागला आहे.
...
केवळ ही कामे ऑफलाईन
नागरिकांना वाहनांचे पासिंग, तसेच परवान्यासाठी द्यावी लागणारी चाचणी. यासाठी परिवहन कार्यालयात जावे लागते. अन्य सर्व कामे मात्र ऑनलाईन सुरु झाली आहेत.
...
एजंटमुक्त कार्यालय होण्याची शक्यता
अनेक कामे ऑनलाईन सुरू झाल्यामुळे परिवहन कार्यालयातील एजंटगिरीला चाप बसला आहे. नागरिकांची आर्थिक पिळवणूक कमी झाली आहे. परिवहन विभागाच्या धोरणामुळे आरटीओ कार्यालय हे एजंटमुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
....
नागरिकच दलालधार्जिणे
आरटीओ कार्यालयातील कामे ऑनलाईन झाली असली तरी अजूनही काही नागरिक एजंटांकडून कामे करून घेत असल्याचे दिसत आहे. कुठे रांगेत उभा राहणार. अधिकाऱ्यांकडे गेलं तर ते रिस्पॉन्स देतील की नाही? आपले काम होईल की नाही? या विचारसरणीमुळे व वेळ वाचविण्यासाठी अधिकचे पैसे देऊन एजंटांकडून कामे करून घेण्याचा त्यांचा कल असतो. त्यामुळे एजंटाचेही फावते. अनेकदा सर्व कागदपत्रे अचूक असूनही ती पूर्ण आहेत की नाहीत. याची शंका असते. एजंटांची वर्षानुवर्षे लागलेली सवय. यामुळे अजूनही नागरिकांचे पाय एजंटाकडेच वळतात.
....
आरटीओ कार्यालयातील सर्व प्रमुख कामे ऑनलाईन पार पडतात. केवळ पासिंग आणि चाचणीकरिता कार्यालयात यावे लागते. काही अडचण निर्माण झालीच तर सहाय्यक परिवहन अधिकारी व इतर कर्मचारी मार्गदर्शन करतील. नागरिकांनी कार्यालयात येऊनच आपली कामे करावीत.
-:दत्तात्रय सांगोलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई.
....