‘कोरोना’चा रुग्ण आढळल्याची अफवा; आरोग्य यंत्रणेची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:19 IST2020-03-12T23:19:05+5:302020-03-12T23:19:30+5:30
कल्याणहून परतलेल्या व्यक्तिला सर्दी, खोकला झाल्याचे समजताच त्याला ‘कोरोना’ झाला, अशी अफवा पसरवली. त्यानंतर आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ झाली.

‘कोरोना’चा रुग्ण आढळल्याची अफवा; आरोग्य यंत्रणेची धावपळ
बीड : कल्याणहून परतलेल्या व्यक्तिला सर्दी, खोकला झाल्याचे समजताच त्याला ‘कोरोना’ झाला, अशी अफवा पसरवली. त्यानंतर आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ झाली. सदरील व्यक्तीची तपासणी केली असता त्याला कोरोनाची कसलीच लक्षणे नसून ही अफवा असल्याचे आरोग्य विभागाने जाहिर केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जावू नये, असे आवाहन पुन्हा एकदा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
कल्याण येथे नोकरीस असलेल्या ३५ वर्षीय इसम गत महिन्यात बीडमध्ये आला. मूळचा तो पाटोदा तालुक्यातीलच असून त्याची बहीणही बाजुच्याच गावातील रहिवासी आहे. गुरूवारी ते बहिणीच्या हट्टापायी तिच्या गावी गेले. त्यांना खोकला असल्याने आणि काही लोकांना ते मुंबई-कल्याणहून आल्याचे समजल्याने त्यांनी याला कोरोनाचे स्वरूप दिले.
ही माहिती आरोग्य विभागाला समजताच नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक संबंधित गावात पोहचले. त्यांची तपासणी केली असता त्यांना छातीत दुखणे, लिव्हरवर सुज, उच्च रक्तदाब असे आजार असल्याचे समजले. त्याने कल्याणमध्ये या आजारावर उपचार घेतल्याचे कागदपत्रांची तपासणी केल्यावर समोर आले.
असे असले तरी त्याला शुक्रवारी तपासणीसाठी आरोग्य केंद्रात बोलावले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश गुंड यांनी सांगितले. त्याच्यात कोरोनाची कसलीच लक्षणे नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आमचे पथक नजर ठेवून असल्याचेही ते म्हणाले.
सर्दी, खोकला म्हणजे कोरोना नव्हे...
थोडासाही खोकला किंवा ताप आला की त्याला कोरोनाचे वळण दिले जात आहे. प्रत्येक सर्दी, खोकला किंवा दुसऱ्या शहरातून आलेल्या व्यक्तीला कोरोना असेलच असे नाही. जर कोणी संशयीत आढळला तर आरोग्य विभाग सतर्क आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी केले आहे.