‘मिशन झीरो डेथ’मधून मिळणार ग्रामीण आरोग्याचा रिपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:29 AM2021-04-26T04:29:53+5:302021-04-26T04:29:53+5:30
: शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी ताईंचे योगदान अंबाजोगाई : ग्रामीण भागात ‘मिशन झीरो डेथ’ मोहिमेअंतर्गत तालुक्यात ...
: शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी ताईंचे योगदान
अंबाजोगाई : ग्रामीण भागात ‘मिशन झीरो डेथ’ मोहिमेअंतर्गत तालुक्यात घरोघरी जाऊन शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीताई हे आरोग्य तपासणी करीत आहेत. त्यामुळे आता ग्रामीण आरोग्याची माहिती संकलित होणार असून, या माहितीच्या आधारे कोविड संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ‘मिशन झीरो डेथ’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी ताईंना सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत. ‘मिशन झीरो डेथ’ ही मोहीम राबवून प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची माहिती घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे शिक्षक त्या गावातील आशा स्वयंसेविका व अंगणवाडी ताईंच्या मदतीने घरोघरी जाऊन कुटुंब प्रमुखांकडून कुटुंबातील प्रत्येकाची आरोग्यविषयक माहिती घेत आहेत.
विलगीकरणाच्या घरांवर स्टिकर
या सर्वेक्षणात कोणास काही आजार आहे का ? सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे, इतर कोणते आजार आहेत काय ? औषधोपचार सुरू आहेत काय ? ऑक्सिजन पातळी किती आहे. कोविड प्रतिबंधक लस घेतली का ? कुटुंबात कुणी कोविड पॉझिटिव्ह आहेत का? असल्यास उपचार कुठे सुरू आहेत, बाधित कुटुंबीय व इतर सदस्य हे होम आयसोलेशनचे नियम पाळतात का, याबाबतची माहिती घेण्यात येऊन होम आयसोलेशन असलेल्या घरांवर स्टिकर लावण्यात येत आहेत.
११२ गावांमध्ये माेहीम
गटविकास अधिकारी डॉ. संदीप घोणसीकर, गटशिक्षण अधिकारी चंदन कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सर्व कर्मचारी संयुक्त योगदानातून तालुक्यातील ११२ गावांत मोहीम प्रभावीपणे राबवित आहेत. यामुळे लवकरच ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची वस्तुस्थिती समोर येऊन यामुळे आरोग्य विभागास मदत होणार आहे.
बाधितांचा शोध घेणे सुलभ होणार
संशयित रुग्णांचे गावातच होम आयसोलेशन, सहव्याधी, वयोवृद्ध, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांना गरजेनुसार अँटिजेन व आरटीपीसीआर टेस्ट करून त्यांना उपचारांसाठी संदर्भ सेवा पुरविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील बाधित रुग्णांचा शोध घेणे शक्य होत आहे. त्यामुळे सर्वेक्षणाकरिता जनतेने सहकार्य करावे.
- चंदन कुलकर्णी, गटशिक्षण अधिकारी, अंबाजोगाई.
मोहिमेत सहभाग
६० ग्रामसेवक, १११० शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, २५१ अंगणवाडीताई, १८८ आशा स्वयंसेविका
३७,९१५ कुटुंबांची माहिती होणार संकलित
१,९१,११६ लोकसंख्येचे सर्वेक्षण तीन टप्प्यांत होणार.
----------
===Photopath===
240421\3024avinash mudegaonkar_img-20210423-wa0045_14.jpg