बीडमध्ये ग्रामीण आरोग्य यंत्रणा ‘आजारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 11:39 PM2020-01-14T23:39:30+5:302020-01-14T23:40:43+5:30
जिल्हा आरोग्य विभागात रिक्त पदांचा ताप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण आरोग्य विभागात १ हजार २ पैकी तब्बल ४२० पदे रिक्त आहेत.
सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा आरोग्य विभागात रिक्त पदांचा ताप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण आरोग्य विभागात १ हजार २ पैकी तब्बल ४२० पदे रिक्त आहेत. यात यंत्रणेचा कणा समजली जाणारी वर्ग ३ व ४ च्या ४०२ पदांचा समावेश आहे. यामुळे योजना, उपक्रमांची अंमलबजावणीसह सेवा तत्पर मिळत नसल्याचे समोर आले आहे. ही पदे भरण्यास आरोग्य विभाग उदासिन असल्याचे दिसते.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अस्थापनेवर गट-अ ची १२८, गट-ब ची २०, गट-क व ड ची ८५४ पदे मंजूर आहेत. गट-अ व ब मध्ये १४८ पैकी १८ पदे रिक्त आहेत. यात अतिरिक्त जिल्ला आरोग्य अधिकारी, माता व बालसंगोपन अधिकारी यांचा समावेश आहे. तर आरोग्य विभागाचा कना समजल्या जाणारी वर्ग ३ व ४ ची पदे मात्र निम्मेच रिक्त आहेत. एकीकडे दिवसेंदिवस लोकसंख्या आणि रुग्णसंख्या वाढत चालली आहे तर दुसऱ्या बाजूला रिक्त पदांचा आकडाही कमी व्हायला तयार नाही. ५० टक्के पदे रिक्त असल्याने आहे त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. याच अधिकारी, कर्मचाºयांचे आरोग्य या कामामुळे धोक्यात आल्याचे दिसत आहे. अनेकांना ताणतणाव, मधुमेह, रक्तदाब अशी असंसर्गजन्य आजारांचीही लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लसीकरण, उपक्रम, योजनांसाठी धावपळ
आरोग्य विभागाकडून सामान्यांसाठी विविध योजना, लसीकरण मोहीम, उपक्रम घेतले जातात. हे सामान्यांपर्यंत घरोघरी जावून पोहचविण्याची सर्वात जास्त जबाबदारी ही वर्ग ३ व ४ ची असते. मात्र, हीच पदे रिक्त असल्याने यांची अंमलबजावणी करताना आरोग्य विभागाल अडचणी येत आहेत. तर आहे त्या कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात धावपळ होताना दिसत आहे.
शल्य चिकित्सकांची आस्थापनाही रिकामीच
जिल्हा रुग्णालय व अधिनस्त असलेल्या आरोग्य संस्थेतील वर्ग १ ची ४४ पैकी ३४ पदे रिक्त आहेत. तसेच वर्ग २ ची १४५ पैकी २० पदे, वर्ग ३ मध्ये ४४२ पैकी १४१ पदे, वर्ग ४ ची ४१३ पैकी १०९ पदे रिक्त आहेत.
विशेष म्हणजे स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधीक्षक अशी महत्वाची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. तसेच परिचारीकांवरही ताण येत असल्याने नातेवाईकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.