विद्यार्थ्यांच्या मदतीला धावणार "लालपरी"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 04:05 PM2020-09-25T16:05:49+5:302020-09-25T16:06:49+5:30
३६ जिल्ह्यांत १८० केंद्रांवर ५ लाख ४१ हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. स्थानिक वगळता ६३ हजार २८४ विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात परीक्षा केंद्रावर ने- आण करण्याची जबाबदारी लालपरीने घेतली आहे.
सोमनाथ खताळ
औरंगाबाद : दि. १ ते २० ऑक्टोबर दरम्यान सामायिक प्रवेश परीक्षा होणार असून राज्यातील ३६ जिल्ह्यांत १८० केंद्रांवर ५ लाख ४१ हजार विद्यार्थी प्रवेशपरीक्षा देणार आहेत. स्थानिक वगळता ६३ हजार २८४ विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात परीक्षा केंद्रावर ने- आण करण्याची जबाबदारी लालपरीने घेतली आहे.
दोन सत्रात विद्यार्थ्यांची ने- आण केली जाणार असून राज्य परिवहन महामंडळाने तसे नियोजन करून प्रत्येक विभाग नियंत्रकांना नुकतेच पत्र पाठविले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०- २१ साठी शासकीय, शासन अनुदानित आणि खाजगी विना अनुदानित महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी तंत्रज्ञान विभागातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील नियोजन १० ऑक्टोबरनंतर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. परीक्षा केंद्रावर विद्यार्थी चार तास आगोदर पोहचतील, असे नियोजन प्रत्येकाने करावे, अशा सूचनाही रापमचे महाव्यवस्थापक यांनी प्रत्येक विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच ऐनवेळी विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्यास जादा बस सोडल्या जाणार आहेत. अशाप्रकारे नियोजन राज्यातील इतर जिल्ह्यांतही असेल, तसेच कोरोनाच्या संदर्भाने सोशल डिस्टंसिंगचे पालन, मास्कचा वापर करण्याबाबतही आवाहन करण्यात आल्याचे रापमने सांगितले. बीड जिल्ह्यातील ३ हजार ७३० विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली असून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याचे पुर्ण नियोजन केले असल्याचे विभाग नियंत्रक बी. एस. जगनोर म्हणाले.