अनाथ असताना मिळाला ‘सहारा’; आता शेकडो हात करणार कन्यादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 07:48 PM2020-02-19T19:48:50+5:302020-02-19T19:49:53+5:30
‘बालग्राम’मध्ये सोहळा : दानशूरच करणार अहेर अन् बांधणार बस्ता
- सोमनाथ खताळ
बीड : अनाथ, उपेक्षित, वंचित मुलांचा सांभाळ करणाऱ्या बालग्राम अनाथालयातील कन्येचा विवाह सोहळा २३ फेब्रुवारीला पार पडत आहे. वयाच्या १४ व्या वर्षी अनाथ म्हणून आलेली बालिका आता २० व्या वर्षी लग्नबंधनात अडकत आहे. ‘सहारा’ देण्याबरोबरच मायेची ऊब मिळाल्यानंतर आता तिचे कन्यादान केले जाणार आहे. या सोहळ्यात दानशूरच अहेर घेणार असून बस्ता बांधण्याची तयारीही काहींनी दर्शविली आहे.
मनीषाचे (नाव बदललेले) न कळणाऱ्या वयातच आई-वडिलांचे छत्र हरवले. नंतर ती आत्याकडे आली; परंतु तिचा येथे व्यवस्थित सांभाळ झाला नाही. साधारण १४ वर्ष वय असताना ती काळोखाच्या रात्री पोलिसांना मिळून आली. ती काहीच सांगत नव्हती. म्हणून पोलिसांनी तिला थेट सहारा अनाथालयात आणले. येथे प्रीती व संतोष गर्जे यांनी तिला सहारा आणि आई-वडिलांचे प्रेम दिले. सहा वर्षे पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याबरोच तिचे शिक्षण पूर्ण केले. चांगले स्थळ आल्याने तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय झाला. सोलापूर जिल्ह्यातील मंगेशने (नाव बदललेले) तिला पसंत करून लग्नाची इच्छा व्यक्त केली. २३ फेब्रुवारीला सकाळी ११.४५ वाजता लग्नाची वेळ ठरविण्यात आली आहे. सोहळ्याला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी आदींची उपस्थित राहणार आहेत. पत्रिका वाटपही सुरू आहे.
सुराणा परिवाराने स्वीकारले पालकत्व
परभणी येथील कविता व गौतम सुराणा यांना मुलगी नाही. त्यांनी मनीषाचे पालकत्व स्वीकारण्याबरोबरच कन्यादानाची तयारी दर्शविली आहे. तिला त्यांनी मानसकन्या मानले आहे. लग्नपत्रिकेवर तसा उल्लेखही आहे. तर प्रीती व संतोष गर्जे आणि बालग्राम परिवाराची कन्या, असाही उल्लेख पत्रिकेवर आहे. लग्नानंतर येणे-जाण्यासह सर्व जबाबदारी सुराणा परिवार घेणार असल्याचे सांगण्यात आले.
मदतीचे आवाहन
बालग्राम परिवारातील मुलीचे हे पहिले लग्न असणार आहे. त्यामुळे खर्चही मोठ्या प्रमाणात आहे. अनेक दानशुरांनी सढळ हाताने मदत केली आहे. आणखी मदतीची गरज व्यक्त केली जात आहे. बालग्राम परिवाराला मदत करण्याचे आवाहन प्रीती व संतोष गर्जे यांनी केले आहे.
१०७ मुलांचा बालग्राम परिवार
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, कैद्यांची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, उपेक्षित, वंचित, निरश्रित अशा विविध गटांतील मुलांचा बालग्राममध्ये सांभाळ केला जातो. सध्या येथे १०७ मुले असून यामध्ये ४८ मुलींचा समावेश आहे. प्रीती व संतोष गर्जे हे तरूण दाम्पत्य या मुलांचा सांभाळ करते.