ध्वजारोहणाला येतो म्हणणारे साहेब आलेच नाही; विनायक मेटेंच्या आठवणींनी कार्यकर्ते गहिवरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 09:30 AM2022-08-15T09:30:27+5:302022-08-15T09:30:35+5:30
पार्थिव पहाटे बीडमध्ये
बीड: शिवसंग्रामचे संस्थापक व माजी आमदार विनायक मेटे यांनी १३ ऑगस्ट रोजी रात्री मराठा आरक्षण बैठकीसाठी बीड सोडले. ध्वजारोहणाला येतो म्हणणारे साहेब आलेच नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते आठवणींनी गहिवरले. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजता विनायक मेटे यांचे पार्थिवदेह मुंबईहून बीडमध्ये आणले.
विनायक मेटे यांच्या उपस्थितीत १४ ऑगस्ट रोजी बीडमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. याची जय्यत तयारी केली होती. मात्र, मराठा अरक्षणासंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याने मेटे यांना अचानक मुंबईला जावे लागले. १४ रोजी दुपारी साडेबारा वाजता बैठक असल्याने मेटे हे १३ रोजीच रात्रीच ११ वाजता बीडहून निघाले होते. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. मुंबईला जाताना त्यांनी तिरंगा रॅलीची जबाबदारी प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोपवून ध्वजारोहण करण्यासाठी परत येतो, असे सांगितले होते. मात्र, दुर्दैवाने १५ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ समर्थकांवर ओढावली. त्यांचे पार्थिव पहाटे साडेतीन वाजता बीडमध्ये आणण्यात आले.
बार्शी रोडवरील निवासस्थानात कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. हुंदके आणि अश्रूंनी वातावरण सुन्न झाले होते. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पार्थिव निवसस्थानापासून शिवसंग्राम भवन येथे आणण्यात आले. अंतिम दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.सकाळी साडेदहा वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. दुपारी साडेतीन वाजता कॅनॉल रोडवरील रामदेव बाबा मैदानाजवळ त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.