८७ लाखांची एक एकर जमीन साईबाबाचरणी दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:29+5:302021-08-01T04:31:29+5:30
गेवराई : गेवराईचे भूमिपुत्र तथा साईबाबा मंदिराचे पुजारी दिलीप सुलाखे यांनी शिर्डीपासून जवळच असलेल्या रुई याठिकाणी त्यांच्या पत्नीच्या नावे ...
गेवराई : गेवराईचे भूमिपुत्र तथा साईबाबा मंदिराचे पुजारी दिलीप सुलाखे यांनी शिर्डीपासून जवळच असलेल्या रुई याठिकाणी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली ८७ लाखांची एक एकर जमीन साईबाबाचरणी देणगीस्वरूपात दान केली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जमिनीची कागदपत्रे देऊन हा निर्णय घेतला होता.
गेवराई तालुक्यातील तांदळा येथील मूळचे रहिवासी असलेले दिलीप सुलाखे हे मागील काही वर्षांपासून शिर्डी याठिकाणी कुटुंबांसह वास्तव्यास असून ते साईबाबा मंदिरात पुजारी आहेत. शिर्डीपासून जवळच असलेल्या रुई याठिकाणी त्यांची पत्नी अंजुश्री सुलाखे यांच्या नावावर असलेली एक एकर जमीन साईबाबाचरणी देणगी स्वरूपात दान करण्याचा निर्णय घेतला. या जमिनीचे सध्या बाजारभावाने ९७ लाख रुपये मूल्य असून आत्ताच शिर्डी येथे झालेल्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यादरम्यान त्यांनी ही एक एकर जमीन साईबाबाचरणी दान करत शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याकडे जमिनीची कागदपत्रे सादर करत ती जमीन संस्थानच्या नावे केली आहे.
साईबाबांच्या चरणी विश्वभरातून दाते सढळ हाताने मदत करतात. त्यांची ही प्रेरणा घेऊनच आपण ही जमीन संस्थानला दिली असल्याचे पुजारी दिलीप सुलाखे यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वीदेखील सुलाखे यांनी समाजोपयोगी उपक्रमात मदत केली आहे. त्यांनी तांदळा या त्यांच्या मूळगावी उभारलेल्या साई मंदिराच्या वतीने सन २०१५ साली तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यामार्फत शासनाकडे दुष्काळ निवारणासाठी १ लाखांची मदत दिली होती.
गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील अमृता नदी खोलीकरणासाठी ५० हजारांचा निधी यासह पंतप्रधान सहायता निधीतदेखील त्यांनी मदत दिलेली आहे. दरम्यान, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी या दातृत्वाबद्दल दिलीप सुलाखे यांच्यासह पत्नी अंजुश्री सुलाखे व कुटुंबीयांचे आभार व्यक्त करत ही जमीन मंदिराच्या योग्य कामासाठी सत्कारणी लावण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही बगाटे यांनी यावेळी दिली.
310721\img-20210731-wa0308_14.jpg