संत दिशा दाखवतात, बुवा दिशाभूल करतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:20 AM2017-12-25T01:20:44+5:302017-12-25T01:20:59+5:30
मयूर देवकर। लोकमत न्यूज नेटवर्क आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : समाजाला लागलेली बुवाबाजी कीड वाढल्याने संत साहित्याची संस्कारशीलता ...
मयूर देवकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : समाजाला लागलेली बुवाबाजी कीड वाढल्याने संत साहित्याची संस्कारशीलता जरी धोक्यात आली असली तरी संतांनी निर्माण केलेल्या संस्कारांमध्येच त्यापासून मुक्ती मिळण्याचा मार्ग आहे, असा निष्कर्ष ‘संत साहित्याने निर्माण केलेली संस्कारशीलता आजच्या बुवाबाजीने नष्ट केली आहे!’ या परिसंवादमध्ये काढण्यात आला. सतीश बडवे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वज्ञ दासोपंत सभागृहात पार पडलेल्या या परिसंवादामध्ये विद्यासागर पाटांगणकर, सचिन परब, मार्तंड कुलकणी आणि शामसुंदर सोन्नर यांनी विचार मांडले.
मराठवाडा साहित्य संमेलनातील पहिल्या परिसंवादामध्येढोंगी बुवा आणि महाराजांचा सुळसुळाट, त्यातून होणारे समाजनैतिकतेचे होणारे पतन, बुवांनी चालविलेला आर्थिक व वैचारिक भ्रष्टाचार आणि यावरील उपाय याविषयी चिंतन करण्यात आले.
मार्तंड कुलकर्णी यांनी संतसाहित्याचा अनुबंध जोडताना सांगितले की, बुवाबाजी ही काही आजची समस्या नसून शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. परंतु, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संतांनी दिलेले संस्कार टिकून राहतील. कारण त्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. परंतु, आजचे ढोंगी महाराज धर्म आणि भक्तीचा बाजार मांडून आर्थिक हव्यासापोटी समाजाची दिशाभूल करतात.
वारकरी संप्रदायातील संत साहित्याचे महत्त्व विशद करताना शामसुंदर सोन्नर म्हणाले, समाजातील सर्व सुधारणावादी चळवळींचा उगम वारकरी संप्रदायातून झाली आहे. समतेचा विचार आणि विवेकशिल समाजनिर्माण झाला पाहिजे हा विचार वारकरी विचारातून आला आहे. परंतु, बुवाबाजीच्या माध्यमातून या विचारांचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. बुवा जर काही करत असतील, ते वैचारिक भ्रष्टाचार करत आहेत.
देशभरात असलेल्या बुवाबाबांच्या सुळसुळाटाला राजकारणीदेखील कारणीभूत आहेत. त्यांचा वरदहस्त अशा ढोंगी लोकांवर असतो. दोघांचा एकमेकांना फायदा होतो. त्यामुळे आपली ‘रुद्राक्ष’ संस्कृती आता ‘द्राक्ष’ संस्कृती होतेय, असे विद्यासागर पाटांगणकर म्हणाले. परिसंवादाच्या शेवटी बडवे अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, संतांनी लोकसंवादी साहित्य निर्माण केले. चित्तशुद्धी आणि लोकोद्धार हे दोन हेतू ठेवून त्यांनी लिखाण केले.
महाराष्ट्रात जे चांगले झाले, ते संत साहित्यामुळेच
संत साहित्य हे त्या त्या काळातील धर्मांधता आणि बुवाबाजीच्या विरोधात केलेले बंड आहे, असे परब म्हणाले. ‘महाराष्ट्रात जे काही चांगले झाले आहे आणि होतेय ते केवळ संत साहित्यातून आलेल्या संस्कारांमुळेच शक्य झाले. संताचे नाव घेऊन वीरेंद्र बाबा, राधे माँ, रामरहीम बाबा, आसाराम बापू यांसारखे बाबा संतांचे विचार सांगत नाहीत. त्यांच्या कुकर्माने संताचे नाव बदनाम होतेय.’