खंडणीखोरांचा बळी ठरले शिक्षक साजेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:31 AM2019-09-20T00:31:07+5:302019-09-20T00:31:38+5:30
बालेपीर परिसरात फंक्शन हॉलजवळ सय्यद साजेदअली मीर अन्सारअली यांचा पूर्व वैमनस्यातून व खंडणीच्या कारणावरुन गुरुवारी धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची माहिती पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील नगर रोड परिसरात बालेपीर परिसरात फंक्शन हॉलजवळ सय्यद साजेदअली मीर अन्सारअली यांचा पूर्व वैमनस्यातून व खंडणीच्या कारणावरुन गुरुवारी धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. आपल्या जीवितास गुजर खान व त्याच्या साथीदारांकडून धोका असल्याची तक्रार साजेद यांनी पोलीस ठाण्यात केली होती. सहा वर्षांपूर्वी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. गुरुवारी दुपारी झालेल्या या घटनेने शहर हादरले.
सय्यद साजेदअली मीर अन्सारअली हे येथील सैनिकी शाळेवर शिक्षक होते. त्यांचे व गुजर खान व त्याच्या साथिदारांचे खडणीप्रकरणी जुने वाद होते. त्यामुळे त्यांनी आपल्या जिवीतास धोका असल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. साजेद हे दुपारी एका चहाच्या हॉटेलवर बसले होते. यावेळी चारचाकी व दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी तलवार, खंजीर, कुकरी, पाईप, लाकडी दांडा या हत्यारांनी हल्ला केला. यात साजेद यांचा अधिक रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
जुन्या वादातून झाला होता हल्ला
सय्यद साजेदअली मीर अन्सारअली यांच्यावर २०१३ साली प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी अन्वरखान मिर्झाखान उर्फ गुजर खान व गँगविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तसेच संबंधित पोलीस ठाण्यात जीवितास धोका असल्याचे अनेक वेळा अर्ज केले आहेत. पोलीस संरक्षणाची देखील मागणी केली होती. परंतु याचे गांभीर्य कोणालाच नव्हते. त्यामुळे हा खून झाला आहे. हा खून देखील गुजर खान व साथीदारांनी केल्याचा आरोप सय्यद साजेद यांच्या बंधूनी केला आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मृतदेह घेतला नाही ताब्यात
आरोपींना जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत सय्यद साजेद यांचा मृतदेह ताब्यात घ्यायचा नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन होऊन देखील मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.
पोलीस अधीक्षक कार्यालयातही मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.
बंधूच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
शिक्षक सय्यद साजेदअली मीर अन्सारअली यांचे भाऊ सय्यद जावेदअली अन्सारअली यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अन्वरखान मिर्झाखान उर्फ गुजर खान, सय्यद नासेर सय्यद नूर, सय्यद शाहरुख सय्यद नूर, उबेद शेख सर्फराज उर्फ सरू डॉन, इम्रान पठाण उर्फ चड्डा, पठाण मुजीब खान मिर्झा खान, शेख शहाबाज शेख कलीम, शेख अमर शेख अकबर, शेख बब्बर शेख युनूस, आवेज काझी, शेख इम्राण शेख रशीद उर्फ काला, शेख मझहर शेख रहिम उर्फ हाम मर्डर व त्यांना साथ देणाऱ्या इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सय्यद साजेद अली यांचे सामाजिक क्षेत्रातही काम
शिक्षक सय्यद साजेदअली मीर अन्सारअली यांच्या जिवीतास धोका होता. त्यामुळे त्यांनी मागील एका महिन्यापासून सैनिकी शाळेवर जाणे बंद केले होेते. तसेच त्यासाठी त्यांनी बिनपगारी रजा घेतली होती, अशी माहिती त्यांच्या भावाने दिली. तसेच ते विविध सामाजिक कार्यात सहभागी होत होते. त्यांनी ‘सर्व धर्माची शिकवण एकच’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या लब्बैक युवा मंचच्या वतीने करण्यात आले होते.