कोविड सेंटरमधील अस्थायी डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:13+5:302021-05-21T04:35:13+5:30
माजलगाव : येथील शासकीय कोविड केअर सेंटरमधील रोजंदारीवरील डॉक्टर-कर्मचारी आदी ७२ जणांचे मागील तीन महिन्यांचे वेतन थकले ...
माजलगाव : येथील शासकीय कोविड केअर सेंटरमधील रोजंदारीवरील डॉक्टर-कर्मचारी आदी ७२ जणांचे मागील तीन महिन्यांचे वेतन थकले असून जिवावर उदार होऊन काम करत असताना या कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांत आपणास वेतन न मिळाल्यास काम सोडून जाण्याचा निर्णय या कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोना महामारीवर रुग्णांना तत्काळ उपचार सुरू करण्यासाठी शासकीय कोविड सेंटर सर्वत्र सुरू करण्यात आले. येथेही केसापुरी कॅम्पवर शासकीय मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर सुरू आहे. या ठिकाणी बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शासकीय कर्मचारी संख्या अपुरी असल्याने रोजंदारीवर कर्मचाऱ्यांना नियुक्त केले. १० डॉक्टर, २७ स्टाफ नर्स, २५ वॉर्डबॉय, ३ डाटा एंट्री ऑपरेटर, ३ फार्मासिस्ट, ३ लॅब टेक्निशियन, एक हॉस्पिटल व्यवस्थापक असे ७२ कर्मचारी अहोरात्र जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. कोरोना रुग्णांना जीवदान मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.
रुग्णांसाठी काम करण्याची जोखीम असल्याने हे कर्मचारी कुटुंबापासून दूर राहात आहेत. असे असताना मागील ३ महिन्यांपासून त्यांचे वेतनच आरोग्य विभागाने अदा केलेले नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर लॉकडाऊनकाळात उपासमारीची वेळ आली आहे.
आम्ही जीव धोक्यात घालून काम करत असताना आमचे वेतन देण्यास का विलंब होत आहे हे कळत नसून आमच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशा प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहेत. दोन दिवसांत वेतन न दिल्यास काम सोडून जाणार असल्याचा निर्णय या कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच येथे काम करणाऱ्या कोविड योद्धा परिचारिका रेणुका वाघमारे यांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून त्यांना आरोग्य विभागाकडून वेळेवर वेतनही दिले जात नाही.
आम्हाला वरिष्ठ कार्यालयातून वेतनाचे पैसे १ मे रोजी प्राप्त झाले आहेत. मात्र, कागदपत्रांची पूर्तता राहिल्याने उशीर झाला आहे. येत्या दोन दिवसांत वेतन देण्यात येईल.
--डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी.