सहा महिन्यांपासून वेतन थकले; माजलगाव पालिका कर्मचाऱ्यांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:15+5:302021-01-24T04:16:15+5:30
माजलगाव नगरपालिका कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायमस्वरूपी चर्चेत असते. या नगरपालिकेकडे ९४ कायमस्वरूपी व १० सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. या ...
माजलगाव नगरपालिका कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायमस्वरूपी चर्चेत असते. या नगरपालिकेकडे ९४ कायमस्वरूपी व १० सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून नगरपालिकेने वेतनच दिलेले नाही. या सहा महिन्यांच्या दरम्यान दसरा, दिवाळी, ईद, संक्रांत यासारखे मोठमोठाले सण येऊन गेले तरी नगरपालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांना एकही महिन्याचा पगार देण्यात आला नाही. यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना सण देखील साजरा करता आला नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना पदाधिकाऱ्यांना मात्र याचे काहीच सोयरसुतक राहिलेले नाही.
येथील कर्मचाऱ्यांचे मागील सहा महिन्यांपासून वेतन नसल्याने अनेक कर्मचारी व त्यांच्या परिवारातील अनेक सदस्यांना दरमहा उपचारासाठी विविध रुग्णालयांत जावे लागते; मात्र या कर्मचाऱ्यांचे वेतनच नसल्यामुळे त्यावर घेण्यात येणारे उपचार थांबविण्याची वेळ आली आहे.
याबाबत येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या नगरपालिकेच्या कोणत्याही बिलासाठी जिल्हाधिकारी यांची मान्यता घेतल्याशिवाय बिल दिले जात नाही; परंतु येथील आस्थापना विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सहा महिन्यांपासून वेतन काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवायचा होता तो पाठविण्यात आला नाही. संबंधित कर्मचाऱ्यावर नगराध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याधिकारी यांचा वचकच राहिला नसल्याने त्याची मनमानी सुरू असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.
कर्मचाऱ्यांना येऊ लागली सहाल चाऊस यांची आठवण
नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले की तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस हे काहीही करून कर्मचाऱ्यांचे वेतन कसे महिन्याच्या महिन्याला भेटेल यासाठी प्रयत्न करत; परंतु मागील वर्षभरात सहाल चाऊस हे अध्यक्ष नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन थकू लागले आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना वेतन थकल्याने सहाल चाऊस यांची आठवण येणे साहजिकच आहे.