शेतकऱ्यांना भेसळयुक्त खताची विक्री; नवा भारत कंपनीविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:50 PM2020-02-14T18:50:15+5:302020-02-14T18:51:26+5:30
नवा भारत या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा माजलगाव ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव : शासनाच्या नियमाप्रमाणे कुठलाही विक्रीचा परवाना नसताना हैदराबाद येथील नवा भारत फर्टीलायझर कंपनी ने भेसळयुक्त खताची विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर नवा भारत या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा माजलगाव ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश मधील हैदराबाद येथील नवा भारत फर्टीलायझर या कंपनीकडून शेतकऱ्यांना विजया ग्रमिन हा बोगस रसायनिक खत विकून फसवणूक करण्यात येत असल्याची घटना तालुक्यातील रामनगर तांडा मोगरा येथील शेतकरी अंकुश चव्हाण, दिलीप राठोड, रोहिदास चव्हाण आदी शेतकऱ्यांनी उघडकीस आणली असून सदर खतांमध्ये दगडी खड्याची मोठ्या प्रमाणात भेसळ असून कंपनीने सुशिक्षित बेरोजगारांना ज्यादा कमिशन चे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. संबंधित कंपनीवर प्रशासनाने कारवाई करून बोगस खताची विक्री बंद करून बोगस खत जप्त करावा व शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
याची गंभीर दखल घेत केंद्रेकर यांनी कृषी विभागाला चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर चौकशीचे चक्रे गतिमान झाली आणि गुणवत्ता नियंत्रक व कृषी विभागाचे पथक माजलगावला पोहचले. पथकाने मंगळवारी सदरील खताची नमुने घेऊन प्रयोग शाळेत पाठवले असल्याचे समजते. तसेच सदरील कंपनीकडे उत्पादन आणि विक्री करण्याचा परवाना नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अन्य काही संशयास्पद बाबी पुढे आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे पुढे आले. यावरून कृषी अधिकारी हजारे यांनी आमरीश नागेश्वर पडीयाला ( रा.औरंगाबाद ) सह नवा भारत फर्टीलायझर कंपनी विरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पि.एस.आय.अनुसया माने या करत आहेत.