साळेगाव खून प्रकरणातील मुख्य आरोपी फरार, साथीदाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:34 AM2021-04-27T04:34:34+5:302021-04-27T04:34:34+5:30
केज : तालुक्यातील साळेगाव येथे जावयाने आपल्या साथीदारासह सासू व मेव्हण्यावर कोयत्याने हल्ला करत सासूचा खून केल्याची घटना रविवारी ...
केज : तालुक्यातील साळेगाव येथे जावयाने आपल्या साथीदारासह सासू व मेव्हण्यावर कोयत्याने हल्ला करत सासूचा खून केल्याची घटना रविवारी घडली होती. या गुन्ह्यात आरोपीला मदत करणाऱ्या प्रशांत बबन उर्फ दिनकर इंगळे याला पोलिसांनी अटक केली असून, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील लोचना माणिक धायगुडे (३५) व त्यांचा चुलत पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे दोघे साळेगाव येथील जावई अमोल वैजेनाथ इंगळे याला भेटण्यासाठी २५ एप्रिल रोजी गेले होते. यावेळी जावई अमोल इंगळे व सासू लोचना माणिक धायगुडे व चुलत पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे यांच्यात वाद झाला. त्यानंतर जावई अमोल इंगळे व त्याचा साथीदार प्रशांत बबन उर्फ दिनकर इंगळे यांनी सासू व मेव्हण्याच्या डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात सासू लोचना धायगुडे या जागीच ठार झाल्या, तर चुलत मेव्हणा अंकुश हा गंभीर जखमी झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, एपीआय संतोष मिसळे, कर्मचारी अशोक नामदास, कादरी, अमोल गायकवाड, मंगेश भोले, दिलीप गित्ते यांनी घटनास्थळी येत तत्काळ सुत्रे हलवत गुन्हा उघडकीस आणला. याप्रकरणी केज ठाण्यात जावई अमोल वैजनाथ इंगळे व त्याचा साथीदार प्रशांत बबन उर्फ दिनकर इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी केज पोलिसांनी प्रशांत बबन उर्फ दिनकर इंगळे याला साळेगाव येथून ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अमोल वैजेनाथ इंगळे हा फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष मिसळ यांनी दिली.