जिद्दीला सलाम! पोलीस स्टेशनसमोर चहाची टपरी चालविणाऱ्याच्या पत्नीची पोलीसदलात निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 08:01 PM2023-05-20T20:01:22+5:302023-05-20T20:03:40+5:30
चहावाल्याची पत्नीने संसाराला हातभारासाठी शिकवणी घेतली पण जिद्द नाही सोडली
- मधुकर सिरसट
केज : जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कठीण परिस्थितीवर सुद्धा मात करता येते याची प्रचीती केजमध्ये दिसून आली. रस्त्यावर चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या बालाजी पाचपिंडे यांच्या पत्नी माधवी यांची पोलिसात एका नाही, तर दोन पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे, संसाराला हातभार लावण्यासाठी माधवी यांनी शिकवणी घेतली, त्यातून वेळ मिळेल तशी तयारी करत त्यांनी हे यश प्राप्त केले.
केज येथील पोलीस ठाण्याच्यासमोर महामार्गालगत चहाची टपरी चालवून बालाजी पाचपिंडे हे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ते लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील मूळ रहिवाशी. उपजीविकेच्या शोधात त्यांनी तीन वर्षांपूर्वी केज या ठिकाणी छोट्याश्या एका टपरीत चहा विक्रीचा व्यवसाय सुरु केला. यातून त्यांना दिवसाकाठी 600 ते 1 हजार रुपये मिळतात. त्यातूनच त्यांना खोलीचा किराया आणि महिन्याचा कुटुंबाचा खर्च भगवावा लागतो.त्यांना राहायला स्वतःचे घर देखील नाही.
केज येथील महात्मा जोतिबा फुलेनगर मध्ये ते एका छोट्याशा खोलीत किरायाने राहतात. पत्नी माधवी पाचपिंडे-वाघचौरे या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊन कुटुंबाला हातभार लावतात. हे करीत असतानाच माधवी यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली. पती बालाजी, नणंद जमादार रुक्मिणी पाचपिंडे यांनी प्रोत्साहन दिले. दरम्यान, माधवी यांची मुंबई पोलिस दलात पोलीस आणि चालक या दोन्ही पदावर निवड झाली. त्या लवकरच प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहेत. मनात आणले तर जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कठीण परिस्थितीमध्ये देखील यश खेचून आणता येते, हेच माधवी पाचपिंडे यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
दोन पदावर निवड, पोलीस ठाण्यात सत्कार...
केज पोलीस ठाण्यासमोर चहाची टपरी चालविणारे बालाजी पाचपिंडे आणि मुंबई पोलिसात पोलीस आणि चालक म्हणून निवड झालेली त्यांची पत्नी माधवी या दांपत्याचा केज पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी आज पोलीस ठाण्यात दोघांचाही सत्कार केला. या वेळी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, आनंद शिंदे, वैभव सारंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, दिलीप गित्ते, संतोष गित्ते, राजू गुंजाळ, बाळासाहेब अहंकारे, रुक्मिण पाचपिंडे, निरडे, सुर्वे, सतीश बनसोडे हे उपस्थित होते.