श्वान टोरसच्या कर्तव्याला सॅल्यूट; वकिलांच्या घरात लाखोंची चोरी, चोरट्याला क्षणात दिले पकडून
By सोमनाथ खताळ | Published: May 31, 2024 06:42 PM2024-05-31T18:42:30+5:302024-05-31T18:48:19+5:30
वकिलाच्या घरी झाली होती चोरी, पावणेचार लाखांचे दागिनेही जप्त
बीड : श्वान हा सर्वांत प्रामाणिक प्राणी आहे. जिल्हा पोलिस दलातही श्वान पथकात टोरस नावाचा श्वान आहे. त्याने माजलगावातील वकिलाच्या घरी झालेल्या चोरीचा छडा लावत चोरट्याला शोधून दिले आहे. याच चोरट्याकडून तब्बल ३ लाख ८० हजार रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. श्वान टोरसच्या या कामगिरीचे कौतुक होत असून, त्याला सॅल्यूट केला जात आहे.
अजित रामभाऊ जगताप, हे वकील असून, त्यांचे माजलगाव शहरातील शाहूनगर भागात घर आहे. मुलीच्या शाळेला सुट्या लागल्याने ते कुटुंबीयांसह गावी सावरगाव येथे गेले होते. त्यामुळे माजलगावातील घर बंद होते. २३ मे रोजी चाेरट्यांनी घरात प्रवेश करत ३ लाख ८० हजार रुपयांचे दागिने आणि रोख साडेसात हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन धूम ठोकली होती. हे समजताच माजलगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याच ठिकाणी श्वान पथकालाही पाचारण केले.
श्वान टोरसने दागिन्यांच्या ठिकाणाचा वास घेतल्यानंतर तो बाजूच्या एका दुकानासमाेर गेला. त्याने आपल्या पोलिसांना इशारा केल्यानंतर येथील संशयित हर्षद ज्ञानेश्वर माने याला त्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानेही या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३ लाख ८० हजार रुपयांचे पूर्ण दागिने जप्त करण्यात आले आहेत. श्वान टोरसच्या या कामगिरीचे पोलिस दलासह सामान्यांमधूनही कौतुक होत आहे.