जादूटोणा करत मुलीच्या स्मरणार्थ उभारली समाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:05 AM2019-06-15T00:05:48+5:302019-06-15T00:06:12+5:30
तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू बाबाने मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी ही समाधी उद्ध्वस्त केली. दरम्यान पोलीस वेळीच पोहचल्याने गावातील तणाव नियंत्रणात आला.
विष्णू गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू बाबाने मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी ही समाधी उद्ध्वस्त केली. दरम्यान पोलीस वेळीच पोहचल्याने गावातील तणाव नियंत्रणात आला.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथून दोन किलोमीटर अंतरावर कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावर सूर्यमंदिर संस्थान आहे. या संस्थानवर हजारो भाविकांची श्रद्धा आहे.
येथून जवळच असलेल्या साठेवाडी येथील सुरेश महाराज धोत्रे यांनी जादूटोणा करीत मयत मुलीचे हाड, बांगड्या, चपला, केस, लिंबू, साडी, चोळी, हळद, कुंकू आदी साहित्य पुरुन रातोरात तेथे समाधी उभारल्याचे शुक्रवारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी हा प्रकार हाणून पाडत समाधी उद्ध्वस्त केली.
या जादूटोणा प्रकारामुळे सुर्यमंदिर संस्थानवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच चकलांबा ठाण्याचे सपोनि विजय देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांना शांततेचे अवाहन करत दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली.
समाधी उकरल्याने संशय खरा ठरला : लिंबू, बांगड्या आढळल्या
सुरेश महाराज धोत्रे यांनी दोन वर्षांपूर्वी मयत झालेल्या त्यांच्या मुलीचे हाड, चपला, बांगड्या, साडी, पीस, हळद-कुंकू, लिंबू आदी साहित्य पुरुन सूर्यमंदिर संस्थानवरील मंदिरासमोरच ही समाधी उभारली होती.
ही माहिती एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल्याने ग्रामस्थांना जादूटोण्याचा संशय आला.
सुरेश महाराज धोत्रे ३०-३५ वर्षांपासून जादूटोणा करत असल्याने संशय अधिकच बळावला. पोलिसांसमक्ष समाधीस्थळ उकरल्याने हा संशय खरा ठरला.
पोलीस वेळेवर आले नसते तर गावातील तणावामध्ये भर पडली असती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.