समरीन खून प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:09 AM2019-07-31T01:09:27+5:302019-07-31T01:10:34+5:30
मुलीची तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे योग्य तपास केला जात नाही. याविरुद्ध विविध संघटनांनी मिळून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील मुलीची तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे योग्य तपास केला जात नाही. याविरुद्ध विविध संघटनांनी मिळून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
१८ जुलै २०१९ रोजी येथील व्यावसायिक शेख लईक शेख उमर यांची कन्या समरीन हिचा तिच्या सासरच्यांनी खून केल्याची घटना घडली होती. त्यापूर्वी समरीने हिने तिच्या आईला फोन करुन आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शेख कुटुंबिय तात्काळ औरंगाबादकडे निघाले, मात्र ते त्याठिकाणी पोहचण्यापूर्वीच तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात गुन्हा नोंद करण्यापासून अनेक अडचणी आल्या. राजकीय वरदहस्त असल्यामुळे आरोपींना अभय दिले जात असल्याचा आरोप मुलींच्या वडिलांनी केला तर याच विरोधात औरंगाबाद पोलीस प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी, यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
यावेळी विविध सामाजिक संघटनांनी या मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवून जाहीर पाठिंबा दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी घोषणा देण्यात आल्या. तसेच विविध मागण्यांसह आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी महिलांनी देखील मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग नोंदविला होता.