एकाच वर्षात १२२ मुली सैराट, ९३ मुलींचा लागला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:40+5:302021-02-27T04:45:40+5:30
बीड : प्रेमप्रकरण असो अथवा फूस लावून पळवून नेणे वर्षभरात जिल्ह्यातून १२२ मुली सैराट झाल्या आहेत तसेच विविध पोलीस ...
बीड : प्रेमप्रकरण असो अथवा फूस लावून पळवून नेणे वर्षभरात जिल्ह्यातून १२२ मुली सैराट झाल्या आहेत तसेच विविध पोलीस ठाण्यांत १५ मुलेदेखील पळून गेल्याच्या तक्रारी पालकांनी नोंदविल्या आहेत. यात प्रामुख्याने १८ वर्षांपर्यंतच्या मुलींचा समावेश आहे. असे असले तरी ९३ मुली व १५ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
मागील तीन वर्षांत ३०९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल केलेले आहेत. १८ वर्षांखालील मुलगी पळून गेली असेल, हरवलेली असेल तर, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. तर, १८ वर्षांच्या पुढील मुली अथवा महिलाच्या गुन्ह्यात मसिंग दाखल करण्यात येते. बहुतांश प्रकरणांत मुली किंवा महिला या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने किंवा सोबत राहण्यासाठी फरार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अपहरण झालेला आकडा मात्र मोठा दिसून येतो. तर अनेक प्रकरणांत सहमतीने पळून गेल्यामुळे या प्रकरणात १८ वर्षे पूर्ण नसले तर, त्या मुला-मुलींना पालकांच्या ताब्यात दिले जाते. दरम्यान, अनेकजण अल्पवयीन असताना फरार झाले असतील तर, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत:हून पोलीस ठाण्यातदेखील हजर झालेले आहेत. पोलीस प्रशासनाकडून मात्र, सातत्याने अशा मुला-मुलींचा तपास विविध ठिकाणी घेतला जातो. त्यामुळे वर्षाअखेर जेवढे गुन्हे दाखल झालेले असतात, त्यापैकी बहुतांश गुन्हे निकाली निघतात, हे पोलीस प्रशासनाचे यश आहे.
कोणत्या महिन्यात किती मुली सैराट
जानेवारी ०९
फेब्रुवारी २६
मार्च १०
एप्रिल २
मे ५
जुलै ८
ऑगस्ट ९
सप्टेंबर १७
ऑक्टोबर ११
नोव्हेंबर ८
डिसेंबर १०
कोणत्या वर्षात किती ?
२०१८- ९३
२०१९-११९
२०२० -१०७
तपासात पोलीस सक्रिय
२०२० साली १८ वर्षे व त्याखालील जवळपास १०७ मुली सैराट झाल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, यापैकी जवळपास ९३ ते ९७ मुली शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर १८ वर्षांवरील मुलींनादेखील पोलिसांनी शोधले आहे. यापैकी अनेकांनी पालकांसोबत जाण्यास नकार दिला आहे.
३ वर्षांत ७५ मुले बेपत्ता
अल्पवयीन मुलींप्रमाणेच मागील तीन वर्षांत जवळपास ७५ मुलेदेखील सैराट झाल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आलेले आहेत. याप्रकरणात देखील पोलिसांनी जवळपास ७४ जणांना शोधून पालकांच्या स्वाधीन केले आहे.
प्रतिक्रिया
विद्यालय तसेच महाविद्यालयातील मुले- मुली यांचे पलायन हा चिंतेचा विषय आहे. हे प्रकार टाळण्यासाठी पालकांनीदेखील सतर्क राहून पाल्यावर लक्ष दिले पाहिजे तसेच त्यांची दिशा भरकटत असल्याचे लक्षात आल्यानंतर समजावून सांगणे गरजेचे आहे. दरम्यान, अशा तक्रारींमध्ये पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेऊन कार्यवाही केली जाते. त्यामुळे, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण जास्त आहे.