खाली वाळू टाकून दिखाव्यासाठी वर रचला जातो खडी, विटांचा थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:14 AM2019-06-23T00:14:29+5:302019-06-23T00:15:51+5:30
गोदावरी नदीकाठच्या गावातून शासनाने अद्यापही वाळूचे ठेके सुरू न केल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावले
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावातून शासनाने अद्यापही वाळूचे ठेके सुरू न केल्याने वाळूमाफियांचे चांगलेच फावले असून, त्यांनी सर्रासपणे अवैध वाळू चोरी भरदिवसा बिनदिक्कतपणे सुरू ठेवली असून अधिकाऱ्यांच्या नजरेस येऊ नये म्हणून नवी शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क टिप्परमध्ये पाच - पाच ब्रास वाळू भरून कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून वर विटा, खडीचा थर रचून वाळूची सर्रासपणे विक्री करण्यात येत आहे. तालुक्यात वाळू माफियांचा वरून कीर्तन आतून तमाशा असा प्रकार सुरु आहे.
माजलगाव तालुक्यात गोदावरीकाठी जवळपास २२ गावे वाळूचे क्षेत्र असलेले असून यावर्षी शासनाने एकाही वाळू ठेक्याचा लिलाव केलेला नाही. बाजारात वाळूला मोठी मागणी असून बीड जिल्ह्यासह राज्यातही गोदावरीच्या वाळूची मागणी आहे. सोन्यापेक्षाही जास्त भाव असलेली वाळू खरेदीसाठी नागरिकांना एका टिप्परसाठी ३० ते ९० हजारापर्यंत रक्कम मोजावी लागत आहे. याचा फायदा घेऊन वाळू माफिया माजलगाव तालुक्यात दिवसारात्रीतून जवळपास १०० टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरी करुन विक्री करीत आहेत . तालुक्यातील गंगामसला, मोगरा, हिवरा, दुब्बाथडी, मंजरथ, महातपुरी, पुरुषोत्तमपरी, सादोळा, आडोळा, आबेगाव आदी गावाच्या परिसरातील गोदावरी नदीपात्रातून उपसा करून वाळूचोरी केली जाते.
वाळू चोरण्यासाठी वाळूमाफिया वेगवेगळ्या शक्कल काढत आहेत. आता या वाळू माफियांनी अधिकारी - पोलीस तसेच कोणाच्याही नजरेत येऊ नये म्हणून टिप्परमध्ये पूर्ण वाळू भरून वरच्या बाजूला विटा अथवा खडीचा थर रचतात. त्यामुळे टिप्परमध्ये विटा किंवा खडी असल्याचे समजून महसूल प्रशासन तसेच नागरिकांची दिशाभूल होते. अशाप्रकारे महसूल प्रशासनाच्या व पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून वाळूमाफिया मात्र स्वत:चे उखळ पांढरे करून घेताना दिसत आहेत. तसेच वाळूचोरीच्या या नवीन पद्धतीमुळे वाळूमाफियांचा वरुन कीर्तन आतून तमाशा चांगलाच गोंधळ माजवू लागला आहे.
शासनाकडूनच स्वत:चे नुकसान
महसूल प्रशासनाने संपूर्ण उन्हाळा उलटला तरी जिल्ह्यात अपेक्षित वाळूच्या ठेक्याचा लिलाव केला नाही. ज्या काही ठेक्याचे लिलाव झाले ते ठेके सुरूच झाले नाहीत. त्यामुळे शासन यातून स्वत:चे नुकसान करून घेत आहे आणि स्वत: बरोबर नागरिकांसह मजूर वर्गाची देखील भरडन करीत आहे. त्यामुळे वाळूमाफियांसह काही भ्रष्टाचारी महसूल अधिकारी, पोलीस प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच फावत आहे.
वाळूपायी घरकुलवाले अडचणीत
वाळूला सोन्यासारखा आलेला भाव, त्यात कुठेही शासकीय वाळू मिळण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे या वर्षी ज्यांना घरकुल मिळाले आहे त्यांची वाळूपाई मोठी पंचाईत होत आहे.
घरकूल मिळालेल्या लाभ धारकांसाठी तरी शासकीय दराने वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे तर वेळेत घरकुल उभे करणाºया लाभार्थ्यांना वाळूसाठी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
साठे केलेली वाळू गाढवाद्वारे विक्री
तालुक्यातील गोदावरी पात्रातून आणून साठवून ठेवलेली वाळू गाड्याद्वारे निघणे अवघड जात असल्यामुळे वाळूमाफियांनी एक आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. १०० गाढव आणून त्याद्वारे साठवून ठेवली वाळू विक्री होत आहे. यामुळे एका गाढवाला ८० ते १०० रुपये बांधकाम धारकाकडून दिले जात आहेत. गाढवावरून दिवसभर वाहतूक सुरू असताना महसूलच्या अधिका-यांचे याकडे लक्ष नसल्याने वाळू माफियांचे फावत आहे.