आष्टी तालुक्यात वाळू माफियांकडून तलाठ्यास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:34 PM2018-01-24T23:34:59+5:302018-01-24T23:35:12+5:30
आष्टी : तालुक्यातील खडकत येथील सीना नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन चालू असल्याची माहिती मिळाल्याने वाळू चोरून नेणा-या ट्रॅक्टरवर ...
आष्टी : तालुक्यातील खडकत येथील सीना नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन चालू असल्याची माहिती मिळाल्याने वाळू चोरून नेणा-या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्यास धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना मंगळवारी सायं. ५ वाजताच्या सुमारास घडली.
खडकत सज्जाचे तलाठी गौतम बळीराम ससाणे यांनी दिलेल्या फियार्दीनुसार मंगळवारी सायंकाळी ५ वाजता त्यांना मौजे खडकत येथील सीना नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याची माहिती त्यांनी तहसीलदार रामेश्वर गोरे यांना दिली आणि ते मंडळ अधिकारी शिंगनवाड यांना घेऊन नदी पात्राकडे गेले.
त्या ठिकाणी त्यांना अशोक शिंदे हा इसम एका ट्रॅक्टरमध्ये वाळू चोरून नेत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी सदर ट्रॅक्टर अडविले आणि त्याला आष्टी तहसीलमध्ये येण्यास सांगितले. यावेळी शरद पवार हा इसम आला त्याने तहसीलकडे निघालेले ट्रॅक्टर अडवून वर बसलेले तलाठी गौतम ससाणे यांना खाली ओढले आणि त्यांना धक्काबुक्की केली.
यावेळी शिंगणवाड यांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळ करत दोघेही चोरीच्या वाळूसह ट्रॅक्टर घेऊन निघून गेले. गौतम ससाणे यांच्या फियार्दीवरून अशोक शिंदे व शरद पवार या दोघांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.