वाळू माफियांकडून तहसीलदारांवर धारदार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 11:58 AM2021-10-28T11:58:13+5:302021-10-28T11:58:40+5:30
माजलगाव तालुक्यात गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होते.
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (बीड ) : येथील तहसीलदार वर्षा मन्नाळे आणि त्यांच्या पथकाने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर आज सकाळी शृंगारवाडी येथे कारवाई केली. मात्र, कारवाईमुळे आक्रमक झालेल्या वाळू माफियांनी तहसीलदार मन्नाळे आणि त्यांच्या पथकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माजलगाव तालुक्यात गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होते. वर्षा मन्नाळे या एक महिन्यापूर्वी येथे तहसीलदार म्हणून रुजू झालेल्या आहेत. त्या आज सकाळी आपल्या पथकासह तालखेडकडे जात होत्या. दरम्यान, टाकरवन येथून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर शृंगारवाडी फाट्याजवळ आली. तहसीलदारांची गाडी पाहताच चालकांनी ट्रॅक्टर सुसाट पळवले. यावेळी एक ट्रॅक्टर पलटी झाले तर दुसरे ट्रॅक्टर पथकाने पकडले.
दरम्यान, ट्रॅक्टर पकडताच वाळूमाफियांनी धारदार शस्त्र काढून तहसीलदार व त्यांच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पथकातील मंडळ अधिकाऱ्यास मारहाण देखील करण्यात आली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक जमा झाल्याने वाळू माफिया पळून गेले. यात महिला वाळू माफियांचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेने तहसीलदार व त्यांच्या साथीदारांवर धक्काबुक्की केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्याचबरोबर बीडहून येणारे मंडळाधिकारी के.सी. पुराणिक यांच्यावर ट्रॅक्टर घालण्याचा देखील प्रयत्न यावेळी झाल्याची माहिती आहे.
हल्ला झाला नाही
याबाबत तहसीलदार वर्षा मन्नाळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, वाळूचे ट्रॅक्टर आम्ही पकडले होते. त्यातील लोक पळून गेले. हल्ल्याचा प्रकार झालेला नाही.