गंगामसल्यात वाळू माफियांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:32+5:302021-04-16T04:33:32+5:30

माजलगाव : तालुक्यातील गंगामसला येथे गावातीलच वाळू माफियांनी महसूल विभागाला हाताशी धरून धुमाकूळ घातला आहे. दररोज रात्री गोदावरी नदी ...

Sand mafia riots in Gangamasalya | गंगामसल्यात वाळू माफियांचा धुमाकूळ

गंगामसल्यात वाळू माफियांचा धुमाकूळ

माजलगाव : तालुक्यातील गंगामसला येथे गावातीलच वाळू माफियांनी महसूल विभागाला हाताशी धरून धुमाकूळ घातला आहे. दररोज रात्री गोदावरी नदी पात्रातून स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूने प्रचंड वाळू उपसा करीत असल्याने गोदावरी नदी पात्रात खड्डेच खड्डे झाले आहेत. पहाटे नैसर्गिक विधीस येणाऱ्या महिलाही प्रचंड वैतागल्या आहेत. वाळू उपसा बिनदिक्कतपणे सुरू असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

तालुक्यातील गंगामसला हे गाव मोरेश्वर गणपतीचे तीर्थक्षेत्र असून येथील गोदावरी नदीच्या विस्तीर्ण नदीपात्रात प्रचंड वाळू साठा असताना मागील काही वर्षात या गावच्या वाळू साठ्याचा लिलाव काही लोकांनी अर्थकारणाच्या हेतूने होऊ दिलेला नसून चोरट्या वाळू वाहतुकीच्या धंद्यात काही जण उतरले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर या गावाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ दररोज रात्री ठराविक लोक बसतात. गावात कोणी घुसू नये म्हणून त्या कमानीच्या रस्त्यावर दगड आडवे लावतात. त्यामुळे गावात नवीन माणूस किंवा वाहन प्रवेश करू शकत नाही आणि इकडे माफियांना वाळू उपसा करता येतो. माफियांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने मॅनेज केले असून त्यांच्या आर्थिक तडजोडीबरोबर त्यांच्या चालकालासुद्धा रोज दोन हजार रुपये टीप दिली जाते.

१८ किलोमीटर अंतरात १० खबरे

यासाठी माजलगाव शहरापासून या वाळूमाफियांनी आपले खबरे पेरले आहेत. माजलगाव ते गंगामसला १८ किलोमीटरच्या अंतरामध्ये दहा खबरे कार्यरत आहेत. दररोज रात्री दहा ते सकाळी दहा या काळामध्ये गावातीलच किमान सहा ट्रॅक्टरमध्ये २० ते २५ कामगार वाळू उपसा करून ते ट्रॅक्टरमध्ये भरून त्याची वाहतूक करून विक्री केली जाते.

किमान ५० ट्रॅक्टर वाळूचा उपसा

गंगामसला गावांमध्ये पाच हजार रुपये ब्रास, तर परिसरातील गावांमध्ये सात, दहा, पंधरा हजार रुपये या दराने सर्रासपणे वाळू विक्री केली जात आहे. रात्रभर यामध्ये किमान ५० ट्रॅक्टरची दररोज वाळू उपसा करून विक्री करण्यात येत आहे. या वाळूमाफियांनी गाव सुरक्षेच्या नावाखाली एक अनोखी शक्कल लढवली आहे. जेणेकरून गावात कोणी येत असेल तर त्यास प्रतिबंध करता येतो.

ग्रामस्थांमध्ये माफियांची दहशत

अधिकारी मॅनेज केल्याने आपले काहीच होत नाही या भावनेने हे माफिया निर्ढावले असून त्यांनी गावांमध्ये देखील मुजोरी सुरू ठेवली आहे. गावामध्ये वाळू ट्रीप टाकताना ट्रॅक्टरने अनेकांच्या घराचे ओटे व भिंतीला धडक देऊन गावकऱ्यांचे नुकसान केलेले आहे. मात्र कोणी काही बोलले तर त्यांना धमकावले जात असल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे.

नागरिकांच्या तक्रारी आल्या, पथक नेमले

आमच्याकडे गंगामसला येथील नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार आम्ही यासाठी एक पथक नियुक्त केले आहे. हे पथक गंगामसला परिसरात लक्ष ठेवून कारवाई करेल

---वैशाली पाटील , तहसीलदार.

===Photopath===

150421\15bed_1_15042021_14.jpg

Web Title: Sand mafia riots in Gangamasalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.