वाळू माफियांची तलाठ्यास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:21 AM2019-01-17T00:21:50+5:302019-01-17T00:22:36+5:30
अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेऊन चल म्हणताच एकाने तलाठ्यास धक्काबुक्की केली.
बीड : अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेऊन चल म्हणताच एकाने तलाठ्यास धक्काबुक्की केली. ही घटना १५ जानेवारी रोजी सांडसचिंचोली येथील सिंदफना नदीपात्रात घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भरत श्रीराम भटे (रा.काडीवडगाव ता.माजलगाव) हे सांडस चिंचोली येथील सज्जावर तलाठी आहेत. मंगळवारी सकाळी ते सांडस चिंचोली येथील सिंदफना नदीपात्रात कोणी वाळू उपसा करते का, हे पाहण्यासाठी गेले होते. त्यांना अशोक कदम (रा.सांडस चिंचोली ता.माजलगाव) हा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळू घेऊन जाताना दिसले. त्यांनी कदमला अडविले आणि पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर घेऊन चल, असे सुनावले. यावेळी कदमने भटे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर तो ट्रॅक्टर घेऊन सुसाट निघून गेला. भटे यांच्या फिर्यादीवरून कदमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.