वाळू प्रकरण खाकीतील बड्या अधिकाऱ्यांच्या येणार अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:09 AM2019-07-22T00:09:34+5:302019-07-22T00:09:52+5:30
वाळू वाहतूकदार व ठेकेदारांनी पोलीस खात्यातील कोणत्या खात्याला व अधिका-याला किती हप्ता दिला जातो याचे निवेदन दिले होते. या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हर्ष पोद्दार यांनी शनिवारी हाती घेतली. त्यामुळे पोलीस विभागात खाबुगिरी करणा-या अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. वाळू वाहतूकदार व ठेकेदारांनी पोलीस खात्यातील कोणत्या खात्याला व अधिका-याला किती हप्ता दिला जातो याचे निवेदन दिले होते. याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक अधीक्षक जी.श्रीधर यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल पोद्दार यांच्याकडे दिला आहे. परंतु या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वाळू प्रकरण काही बड्या अधिका-यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
गेवराई तालुक्यातील राजापूर येथील वाळू साठ्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कारवाई केल्यानंतर अनेक ठिकाणी वाळू साठ्यावर कारवाई झाली होती. जिल्ह्यातील वाळू ठेकेदार व वाहतूकदारांनी कोणत्या नियमांचे पालन करावे यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व सर्व पोलीस ठाण्याच्या अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
या बैठकीमध्येच एक पोलीस अधिकारी म्हणाले, ‘हे वाळूवाले चोर आहेत, आदेश द्या साहेब यांना आत टाकतो’ मात्र, तो अधिकारी बैठकीला येण्यापूर्वीच वाळूच्या हप्त्याचे पैसे घेऊन आल्याचे बैठकीच्या ठिकाणी कोणीतरी बोलले. त्यामुळे पोलीस व वाळू वाहतूकदार व ठेकेदार यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. यानंतर वाळू ठेकेदार व वाहतूकदारांनी महसूल व पोलीस खात्यातील ‘हप्तेखोर’ अधिका-यांची यादी देत कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले होते.
याच प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी उविभागीय अधिकारी मुळे यांना एकतर्फी कार्यमुक्त केले होते. तसेच इतर तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला होता. मंडळअधिकारी व तलाठी यांना निलंबित केले होते. मात्र, निवेदन देऊन देखील पोलीस खात्यातील एकाही अधिका-यांवर कारवाई झालेली नाही. तसेच वाळू ठेकेदार व वाहतूकदारांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, निवेदनात ज्या विभागांची नावे आली आहेत त्यांच्या प्रमुखांची मात्र कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
कॉल रेकॉर्ड तपासण्याची होती मागणी
वाळू ठेकेदार व वाहतूकदारांनी निवेदनात संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिका-यांचे हप्ते गोळा करणा-या कर्मचा-यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती.
मात्र, पोलीस खात्यातील अनेक वरिष्ठ अधिका-यांपर्यंत अर्थपूर्ण व्यवहार झालेला असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळटाळ केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
होणार खांदेपालट
नवीन पोलीस अधीक्षक रुजू झाल्यानंतर सर्वच विभागातील जुन्या अधिका-यांचा पदभार काढून खांदेपालट केली जाणार असल्याची देखील माहिती आहे. कारण वाळू प्रकरणात दिलेल्या निवेदनात पोलीस खात्यातील कोणत्या खात्याला किती हप्ता दिला जातो याचा देखील उल्लेख होता. त्यामुळे या निवेदनात आलेल्या खात्यांचे प्रमुख बदलले जाणार असल्याची चर्चा आहे.
नवीन पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष
वाळू ठेकेदार व वाहतूकदार यांनी दिलेल्या निवेदनावर नवीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडून संबंधित पोलीस अधिका-यांबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाळू प्रकरणातील निवेदनामध्ये ज्यांनी स्वाक्षरी केल्या होत्या त्यांच्यातील काही जणांना धमकावल्याचे देखील सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.