काकाला पुतण्या ठरला ‘भारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:47 AM2019-01-29T00:47:37+5:302019-01-29T00:48:01+5:30
. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर गटाचा उमेदवार अपक्ष रिंगणात उतरला होता. त्यांचा पराभव करून संदीप क्षीरसागर हा पुतण्या नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर या काकाला भारी ठरल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड नगर पालिकेच्या प्रभाग क्र.११ अ मधील पोटनिवडणूकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि संदीप क्षीरसागर गटाच्या मोमीन खमरून्निसा शरीफोद्दीन या ३१५ मतांनी विजयी झाल्या. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर गटाचा उमेदवार अपक्ष रिंगणात उतरला होता. त्यांचा पराभव करून संदीप क्षीरसागर हा पुतण्या नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर या काकाला भारी ठरल्याचे दिसून आले.
तीन अपत्य असल्याच्या कारणावरून तत्कालीन नगरसेविका अर्शिया सईद चाऊस यांना अपात्र ठरविले होते. त्यानंतर प्रभाग क्र.११ अ साठी पोटनिवडणूक घेण्याचे आदेश झाले. त्याप्रमाणे रविवारी दोन मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सोमवारी सकाळीच मतमोजणी सुरू झाली. सुरूवातीपासूनच मोमीन खमरून्निसा शरीफोद्दीन या आघाडीवर होत्या. शेवटच्या राऊंडपर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवत ३१५ मतांनी विजय मिळविला. विजयाची बातमी समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोर गुलालाची उधळण केली. संदीप क्षीरसागर, उमेदवाराला खांद्यावर घेऊन राष्ट्रवादी भवनापर्यंत ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
काका-पुतण्याची टक्कर
नगर पालिका निवडणूकीत काका डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना मात देत संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना आघाडीने सत्ता स्थापन केली होती. नंतर एमआयएमचे नगरसेवक फुटल्याने सत्ता परिवर्तन झाले. आता पुन्हा एकदा संदीप यांनी काका डॉ.क्षीरसागर यांना मात दिली आहे. प्रत्येक निवडणूकीत संदीप क्षीरसागर आता काकाला काट्याची टक्कर देत असल्याचे दिसून येत आहे.
जागा कायम ठेवण्यात यश
अपात्र ठरलेल्या अर्शिया चाऊस या सुद्धा काकू-नाना आघाडीच्या उमेदवार होत्या. आता पुन्हा संदीप क्षीरसागर यांचाच उमेदवार विजयी झाल्याने त्यांना ही जागा कायम ठेवण्यात यश मिळाले.