ऐन दुष्काळात मांजरा धरण ठरले संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:24 AM2019-05-26T00:24:44+5:302019-05-26T00:25:24+5:30

या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ३२ गावातील लाखो लोकांची दुष्काळी परिस्थितीतही तहान भागवत आहे.

Sanjivani became Manjra Dam during the famine of Ain | ऐन दुष्काळात मांजरा धरण ठरले संजीवनी

ऐन दुष्काळात मांजरा धरण ठरले संजीवनी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील ३२ गावांसह शेजारच्या जिल्ह्यांनाही पाणीपुरवठा । जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध

दीपक नाईकवाडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणबीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ३२ गावातील लाखो लोकांची दुष्काळी परिस्थितीतही तहान भागवत आहे. मांजरा धरणात पिण्याच्या पाण्यासाठी जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याने हे धरण तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना संजीवनी ठरले आहे.
केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातून लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ३२ गावांना तसेच लातूर एमआयडीसीसह येडेश्वरी साखर कारखान्यास पाणी पुरवठा केला जातो.
मागील दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात मांजरा धरण कोरडेठाक पडल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या, तर लातूरच्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी शासनास लातूर येथे रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता, तर बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.
दोन वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीने कोरडेठाक पडलेले मांजरा धरण परतीच्या पावसात अवघ्या तीन दिवसात भरल्याने बीड, लातूर ,उस्मानाबाद जिल्ह्यातील ३२ गावांना या धरणातून परत पाणीपुरवठा चालू करण्यात आला. मात्र, याही वर्षी पावसाने दगा दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने परत एकदा तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. मात्र, या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत बीड, लातूर ,उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना मांजरा धरण संजीवनी ठरले आहे.
मांजरा धरणातून बीड जिल्ह्यातील केज ,धारुरसह १२ गावांची पाणीपुरवठा योजना, भालगाव, युसूफवडगाव, माळेगाव, धनेगाव, नायगाव, साळेगाव येथील नागरिकांना, लातूर जिल्ह्यातील लातूर महानगर पालिका , ग्रामपंचायत मुरुड, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरासह शिराढोण, पूर्व लोटा, कोथळा, आवाढ, शिरपुरा, करंजकल्ला, दाभा , हिंगणगाव या गांवाना पाणीपुरवठा योजनाद्वारे मांजरा धरणातुन पाणी पुरवठा होत आहे.
दुष्काळी परिस्थिती असतानाही आजमितीस मांजरा धरणात १४.३५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये काही अंशी गाळ असण्याची शक्यता आहे. बीड , लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील योजनेस पाणीपुरवठा करण्यासाठी वार्षिक २ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. वर्षात धरणातुन २ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने धरणातील पाण्याचा पिण्याच्या पाण्यासह बाष्पीभवनासह एकूण ४ दशलक्ष घनमीटर वापर होतो.
धरणातील सद्य:स्थितीतील उपलब्ध पाणीसाठा पाहता जुलै अखेरपर्यंत हे पाणी तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवणार असल्याने ऐन दुष्काळातही मांजरा धरण बीड ,लातुर , उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी संजीवनी ठरले आहे.
केज, धारुर तसेच १२ गाव पाणीपुरवठा योजना धरणपातळीवरुन एक मीटर उंचीवर असल्याने नगरपंचायतने पाणी पुरवठा करण्यासाठी चर खोदण्याची आवश्यकता आहे. तसे नियोजन झाल्यास अडचणी दूर होऊ शकतात. सद्य:स्थितीमध्ये केज धारुरसह १२ गावाना मांजरा धरणातून जुलै अखेर पर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती शाखा अभियंता शहाजी पाटील यांनी दिली आहे.
आवाहन : पाणी काटकसरीने वापरा
मांजरा धरणातून पाणीपुरवठा होत असलेल्या गावातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास मांजरा धरणातील पाणी एक महिना जास्त म्हणजे आॅगस्टपर्यंत पुरु शकते अशी माहिती पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक १ चे शाखा अभियंता शहाजी पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Sanjivani became Manjra Dam during the famine of Ain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.