माजलगावात आज संकल्प निरोगी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:19+5:302021-07-22T04:21:19+5:30
माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात संकल्प निरोगी अभियान गुरुवारी घेण्यात येणार आहे. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांची त्या-त्या कार्यालयात जाऊन तपासणी ...
माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात संकल्प निरोगी अभियान गुरुवारी घेण्यात येणार आहे. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांची त्या-त्या कार्यालयात जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. लहान मुलांना ऑनलाइनद्वारे कोविडविषयी माहिती दिली जाणार असल्याची माहिती डॉ.गजानन रुद्रवार व डॉ.मधुकर घुबडे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचेही आयोजन केले आहे. ग्रामीण रुग्णालयात जे रुग्ण दाखल आहेत, त्या रुग्णांच्या नातेवाइकांची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात गरोदर मातांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर, न्युमोकोकल काॅन्ज्युगेट व्हॅक्सिन या नवीन लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार असून, ही लस लहान बालकांना देण्यात येणार आहे. या व्हॅक्सिनमुळे न्युमोकोकल आजारामुळे बाधित बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही व बालकांचा मृत्यूपासून बचावही होणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन रुद्रवार यांनी दिली. माजलगाव तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रातही गरोदर मातांचे लसीकरण व लहान बालकांना न्युमोकोकल काॅन्ज्युगेट व्हॅक्सिन देण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे यांनी दिली.
पाेलीस, कर्मचाऱ्यांची तपासणी
मागील एक वर्षापासून कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करणाऱ्या तहसील, पंचायत समिती, नगरपरिषद पोलीस ठाणे व न्यायालयातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मधुमेह, रक्तदाबाची तपासणी या अभियानातून केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शाळकरी मुलांना कोरोनाविषयी माहिती व्हावी, म्हणून शाळेत जाऊन आरोग्य कर्मचारी ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहेत, तसेच विद्यार्थ्यांच्या लहान शस्त्रक्रियाही या शिबिरात होणार आहेत.