Sapna Chowdhary: सपना चौधरीच्या ठुमक्यांनी बीडचं पब्लीक बेभान, दहीहंडी उत्सवात शेतकऱ्यांचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 10:53 AM2022-08-19T10:53:38+5:302022-08-19T10:54:28+5:30
बीडमधील दीप ज्योत ग्रुपच्यावतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
बीड - कोरोनाच्या सावटानंतर दोन वर्षांनी महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा होत आहे. बीड जिल्ह्यातही यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. प्रसिद्ध हरियानी डान्सर सपना चौधरीला बीडकरांनी बोलावलं होतं. सपनाला पाहण्यासाठी बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बेभान होऊन तरुणाई या उत्सवात सहभागी झाल्याचं दिसून आलं. आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणाईने दुकानाच्या छतावर क्रेन मिळेल त्या ठिकाणी बसून सपनाची झलक पाहिली. सपनानेही चाहत्यांना नाराज न करत तेरी आँखियों के ये काजल.... गाण्यावर ठुमके दिले.
बीडमधील दीप ज्योत ग्रुपच्यावतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विनायक मेटे यांचे दोन दिवसापूर्वी अपघाती निधन झालं. त्यामुळे, कार्यक्रमात सुरुवातीला दोन मिनिटं स्तब्ध राहून मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दोन वर्षानंतर बीडकरांनी जोरदार दही हंडी उत्सवाचा अनुभव घेतला. तेरी अखियों का ये काजल. या प्रसिद्ध गाण्यावर सपनाने ठुमके लगावले, बीडकरांनी देखील याला दाद दिली.
दरम्यान, याआधी देखील परळीमध्ये सपना चौधरीचे ठुमके जिल्हावासीयांनी अनुभवले होते. मात्र, दहीहंडी निमित्त सपना आली असता तिने महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सव पाहण्याची इच्छा व्यक्त केली. बीडकरांनी तिची ही इच्छा पूर्ण केली. मात्र, दुसरीकडे अतिवृष्टीने शेतकरी संकटात असताना हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात घेतल्याने, पुढारी शेतकऱ्यांचे दुःख विसरल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना नेते योगेश क्षीरसागर, भाजप नेते भगीरथ बियाणी यासह विविध पक्षातील मंडळी सपनाचा डान्स पाहण्यासाठी आले होते. तर, काही शेतकरी नेत्यांचीही याठिकाणी हजेरी होती.