सराईत दरोडेखोराचे पोलीस ठाण्यातून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:35 AM2021-09-03T04:35:01+5:302021-09-03T04:35:01+5:30

बीड/अंबाजोगाई : सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, या आरोपीने ...

Sarait robber escapes from police station | सराईत दरोडेखोराचे पोलीस ठाण्यातून पलायन

सराईत दरोडेखोराचे पोलीस ठाण्यातून पलायन

Next

बीड/अंबाजोगाई : सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी ठेवत पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता अंबाजोगाई शहर ठाण्यात हा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

समाधान वैरागे (३२, रा. जवळबन, ता. केज) असे त्या आरोपीचे नाव आहे. २०१६ मध्ये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंपावर दरोडा पडला होता. या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. मात्र, पोलिसांना तो सापडत नव्हता. दरम्यान, तो जवळबन येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून १ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना केले. या पथकाने दिवसभर पाळत ठेवून सायंकाळी समाधान वैरागे याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, वैद्यकीय तपासणी करून त्यास अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पथक निघून आले. ठाणे अंमलदाराच्या खुर्चीजवळ बसलेल्या समाधान वैरागे याने पोलीस कामात व्यस्त असल्याची संधी साधत रात्री साडेआठ वाजता ठाण्यातून पलायन केले. तो पळून गेल्याने ठाण्यात एकच गोंधळ उडाला. गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीनेे पकडलेला आरोपी शहर पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याने खळबळ उडाली आहे.

...

दोन पथके मागावर

समाधान वैरागे हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर दरोड्यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे एक व शहर पोलीस ठाण्याचे एक अशी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ व अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब वाघ या पथकांच्या संपर्कात आहेत.

....

Web Title: Sarait robber escapes from police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.