वाचनकट्टा ते वाचनालयापर्यंत समृध्द झाला ‘सरस्वती’ दरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:30 AM2019-04-23T00:30:56+5:302019-04-23T00:31:21+5:30
गेवराई तालुक्यातील ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत १५ आॅक्टोबर २०१७ रोजी केंद्रप्रमुख ए.टी. चव्हाण यांच्या हस्ते सुरु झालेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्ट्याचा प्रवास मोठ्या वाचनालयापर्यंत पोहचला आहे.
विष्णू गायकवाड। गेवराई
गेवराई तालुक्यातील ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत १५ आॅक्टोबर २०१७ रोजी केंद्रप्रमुख ए.टी. चव्हाण यांच्या हस्ते सुरु झालेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्ट्याचा प्रवास मोठ्या वाचनालयापर्यंत पोहचला आहे.
विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटावे, वाचन संस्कृती वाढावी या दृष्टिकोनातून हा उपक्र म सुरू केला. वाचनाने व्यक्तिमत्व समृद्ध आणि भाषा विकास होतो. तांड्यावरील लेकरांच्या बोलीभाषेची समस्या होती. यासाठी शिक्षक किरण गायकवाड यांनी शाळेत दर शनिवारी ‘वाचू आनंदे’ हा तास सुरु केला. या तासात एका पुस्तकाचे वाचन केल्यानंतर स्थानिक शिक्षण प्रेमींकडून बोलीभाषेत चर्चा केल्याने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण झाली. हे पाहून सामाजिक कार्यकर्ते आत्माराम चव्हाण यांनी २० हजार रु पये खर्च करून वाचन कट्टा बांधून दिला. विद्यार्थी गट करून विविध पुस्तके वाचू लागले. विद्यार्थ्यांना पुस्तकरु पी मित्र मिळाल्याने ऊसतोड मजूर तांडा असूनही विद्यार्थ्यांचे १०० टक्के स्थलांतर रोखले. २७ पट असणारी शाळा वाचनाच्या आनंदाने दोन वर्षांत ७२ पटापर्यंत पोहचली. शाळेने लोकसहभागातून पाच हजार पुस्तकांचे वाचनालय उभारण्याचा उपक्रम हाती घेतला, याला प्रतिसादही मिळाला.
या वाचनालयाचे उद्घाटन १ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले. या दिवशीच २०० ते २५० पुस्तकांची मेजवानी विद्यार्थ्यांसाठी देण्यात आली. उपसरपंच आकाश जाधव यांनीही शाळेला ५० पुस्तके भेट दिली. ठाकरवाडीतील विद्यार्थी हे वाचनाने माणूस म्हणून निर्माण होत आहेत. शाळेत ज्ञान घेण्यासाठी येणारे विद्यार्थी भविष्यात सेवा करण्यासाठी निश्चितच जातील. आपणही आमच्या विद्यार्थ्यांना पुस्तकरूपाने मित्रांची भेट द्या, असे आवाहन येथील शिक्षक गायकवाड यांनी केले.
पुस्तकांचा दवाखाना
आजारी पडू नये म्हणून शाळेतच पुस्तकांचा दवाखाना सुरू केला. दोन विद्यार्थी डॉक्टर आजारी पुस्तकांची काळजी घेतात. (पुस्तकांना डिग, चिकटपट्टी लावणे, फाटलेली पुस्तक चिकटवणे, टाके घेणे, पुस्तके शिवणे) पुस्तकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रेम निर्माण झाले. पुस्तकरुपी मित्रांना जपून ठेवण्यासाठी फुलचंद बोरकर (जि. प. सदस्य धोडराई) यांनी ४ हजार रु पये किमतीचे कपाट वाचनालयाला भेट दिले. विद्यार्थी पुस्तकांशी बोलू लागले, हसू लागले, पुस्तकांशी मैत्री करून कपाटात जपून ठेवू लागले.