भ्रष्टाचारप्रकरणी जनतेतून निवडून आलेल्या नांदूर हवेलीच्या सरपंच बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:07 AM2019-05-20T00:07:40+5:302019-05-20T00:09:05+5:30
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून १३ लाख १९ हजार ७८७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील नांदूर हवेली येथील सरपंच संताबाई सुभाष बुधनर यांना बडतर्फ करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून १३ लाख १९ हजार ७८७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील नांदूर हवेली येथील सरपंच संताबाई सुभाष बुधनर यांना बडतर्फ करण्यात आले. जि.प. सीईओंच्या अहवालानंतर अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी ही कारवाई केली.
नांदूर हवेली ग्रामपंचायतमध्ये विकासकामांच्या नावाखाली १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाला होता. यासंदर्भात सरंपच संताबाई बुधनर व ग्रामसेवकाविरुध्द येथील शाहेद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश बुधनर, कुंडलिक बुधनर, शेख शहेबाज करीम या सदस्यांनी आक्षेप नोंदवला होता. यासंदर्भात सीईओ अमोल येडगे यांच्या आदेशावरुन चौकशी झाली होती. यात गंभीर स्वरुपाचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. सीईओ येडगे, डेप्युटी सीईओ डॉ. सुनील भोकरे यांनी १६ मार्च २०१९ रोजी अप्पर आयुक्तांना अहवाल सादर केला होता. त्याआधारे अप्पर आयुक्त क्र. २ डॉ. विजयकुमार फड यांनी सुनावणी घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८, ३९ (१) प्रमाणे सरपंच बुधनर यांना बडतर्फ करण्याचे आदेश काढले. उर्वरित पदावधीत सरपंचपदासाठी निवडणूक लढविण्यासाठी त्यांना अपात्र ठरविले आहे. १४ व्या वित्त आयोगातील निधीतून अपहार केल्याप्रकरणी थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर कारवाई होऊन बडतर्फ होण्याची पहिलीच घटना असल्याचे शाहेद पटेल म्हणाले.