पंधराव्या वित्त आयोगाच्या प्रशिक्षणाकडे सरपंच, सदस्यांनी फिरवली पाठ.- A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:32 AM2021-02-13T04:32:44+5:302021-02-13T04:32:44+5:30
नांदूरघाट : पंधराव्या वित्त आयोगाच्या प्रशिक्षण कार्यशाळेकडे सरपंच, सदस्यांनी पाठ फिरवली. ग्रामसेवकही वाट पाहून कुलूप लाऊन निघून गेला. ११ ...
नांदूरघाट : पंधराव्या वित्त आयोगाच्या प्रशिक्षण कार्यशाळेकडे सरपंच, सदस्यांनी पाठ फिरवली. ग्रामसेवकही वाट पाहून कुलूप लाऊन निघून गेला.
११ फेब्रुवारी रोजी १५व्या वित्त आयोगाच्या प्रशिक्षणासाठी व ग्रामपंचायत विकास आराखड्यासंदर्भात नांदूरघाट जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण व शिरूरघाट पंचायत समिती गण या दोन ठिकाणी आपापल्या गणातील सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांचे प्रशिक्षण क्षमता बांधणी कार्यक्रम कार्यशाळा आयोजित केली होती. नांदूरघाट पंचायत समिती गणातील नांदूरघाट ग्रामपंचायतमध्ये तसेच शिरूरघाट पंचायत समिती गणातील शिरूरघाट येथे ही कार्यशाळा ठेवण्यात आली; परंतु दोन्ही ठिकाणी नांदूरघाट जिल्हा परिषद सर्कलमधील ९० टक्के सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे कार्यक्रमाला आलेच नाहीत. महत्त्वाचे म्हणजे त्या गावचे ग्रामसेवकच गैरहजर होते. त्यामुळे या कार्यशाळेचा पूर्ण फज्जा उडाला.
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान, सबकी योजना, सबका विकास या अंतर्गत पुढील पाच वर्षांचा १५वा वित्त आयोग कसा येणार, कसा खर्च करायचा, त्यामधून कोणत्या योजना येणार, कोणत्या करायच्या याबद्दल महत्त्वाची कार्यशाळा होती; परंतु सबकी योजना, सबका विकास या वाक्याचा या नेतेमंडळींनी विपर्यास करून सबकी योजना खुदका विकास असे केले.
नांदूरघाट ग्रामपंचायतीत १६ सदस्य; परंतु स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये महत्त्वाचा कार्यक्रम असताना दोन ते तीनच सदस्य उपस्थित होते व एकमेव सरपंच. जवळपास ८० टक्के सदस्य गैरहजर होते. वेळ दहा वाजेची असताना १ वाजेपर्यंत कोणीच आले नाही. १ वाजता नांदूरचे ग्रामसेवक कुलूप लावून केजला निघून गेले. याचा अर्थ कागदोपत्री प्रशिक्षण दाखवायचे.
आजच्या प्रशिक्षणाला नांदूर पंचायत समिती गणातील कोणीच आले नव्हते ते आलेच नाही मी काय करू. नांदूरघाट ग्रामपंचायतचे सरपंच होते व दोन सदस्यांचे प्रतिनिधी होते. बाकीचे कोणीच आले नाही. ते आले नाही तर मी काय करू. १ वाजेपर्यंत वाट पाहिली.
भगवान सिरसाट, ग्रामसेवक नांदूर