वरपगावचे सरपंच अंकुश शिंदे अपात्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:30 AM2021-01-21T04:30:54+5:302021-01-21T04:30:54+5:30
अंबाजोगाई : तालुक्यातील वरपगाव येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दोन खोल्या पाडल्यानंतर सरपंचाने निघालेले दगड, गज, खिडक्या ...
अंबाजोगाई : तालुक्यातील वरपगाव येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दोन खोल्या पाडल्यानंतर सरपंचाने निघालेले दगड, गज, खिडक्या आदी साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत एका सदस्याने तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी होऊन त्यात दोषी आढळल्याने अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी सरपंचास अपात्र ठरवून पदावरून काढून टाकले.
वरपगाव येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील दोन खोल्या जीर्ण झाल्याने त्या पाडण्याबाबत ग्रामपंचायत सभेत ठराव घेण्यात आला. जि. प. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये या दोन खोल्या पाडण्याची परवानगी दिली. मात्र, सरपंच अंकुश पांडुरंग शिंदे यांनी ग्रामपंचायतीला न कळवता त्या दोन खोल्या पाडून निघालेले चिरेबंदी दगड, पत्रे, फरशी, अँगल या साहित्याची परस्पर विक्री केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य तानबा बाबूराव लांडगे यांनी केली होती. तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीअंती त्यांनी शासकीय साहित्य मालमत्तेची विक्री करताना सरपंच अंकुश शिंदे यांनी अनियमितता केल्याचा ठपका ठेवत अहवाल अपर विभागीय आयुक्तांना सादर केला. दोन्ही बाजू समजावून घेतल्यानंतर अपर आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी सरपंच अंकुश शिंदे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे नमूद केले आणि ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये शिंदे यांना अपात्र ठरवून पदावरून काढून टाकले. तथापि, या निर्णयाविरुद्ध १५ दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील करण्याची मुभा अंकुश शिंदे यांना देण्यात आली आहे.