सभागृहावर अतिक्रमण केले; काढण्यास सांगताच सरपंचाच्या भावांचे डोके फोडले, १५ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 01:47 PM2022-01-07T13:47:18+5:302022-01-07T13:50:14+5:30
कांदेवाडी (ता. धारूर) येथील दलित वस्तीसाठीचे सभागृह आणि ग्रामपंचायतचा बोअरवेल्स यावर भरत कांदे व परिवाराने अतिक्रमण केलेले आहे.
दिंद्रुड (बीड)- गावातील सार्वजनिक दलितवस्ती सभागृहावरील अतिक्रमण काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरून सरपंचाच्या भावांना जबड मारहाण करत डोके फोडल्याची घटना धारुर तालुक्यातील कांदेवाडी येथे घडली आहे. ही घटना २७ डिसेंबरला घडली असून या प्रकरणी तब्बल १० दिवसानंतर पंधरा जणांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कांदेवाडी (ता. धारूर) येथील दलित वस्तीसाठीचे सभागृह आणि ग्रामपंचायतचा बोअरवेल्स यावर भरत कांदे व परिवाराने अतिक्रमण केलेले आहे. काही दिवसांपूर्वी सरपंच मीरा केशव खाडे व ग्रामसेवक रमेश देशमुख यांनी कांदे यास अतिक्रमण काढण्यास सांगितले. यामुळे संतापलेल्या भारत कांदे याने सरपंच पती केशव खाडे यांना फोनवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. २७ डिसेंबरला त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यानंतर दिंद्रुड पोलिसांनी खाडे यांना बोलावून घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत असलेले प्रकाश रोहिदास कांदे व श्रीकृष्ण रोहिदास कांदे यांना भरत कांदे, सतीश ज्ञानोबा कांदेसह १५ जणांनी दिंद्रुड येथील भर चौकात अडवत, ''तुझी सरपंच बहीण आमच्या नादाला कशाला लागत आहे, आम्ही तुम्हा सर्वांना जीवे मारू'', असे म्हणत दोघांनाही बेदम मारहाण केली. मारहाणीत प्रकाश व श्रीकृष्ण या दोन्ही भावंडाचे डोकी फुटली असून शरीरावर जखमा झाल्या आहेत. दोघांवर आंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी प्रकाश कांदे यांच्या जबाबावरून घटनेच्या तब्बल १० दिवसानंतर भरत कांदेसह १५ जणांवर दिंद्रुड पोलिसात जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नंबर ०४/२०२२ नुसार कलम ३०७, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ भादवी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सपोनि प्रभा पुंडगे करत आहेत.