जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे एकाच गणवेशावर समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 07:12 PM2021-01-02T19:12:29+5:302021-01-02T19:13:32+5:30
Zilla Parishad school students प्रतिवर्षी इतर मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल व डीआरडी घटकांतील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दोन गणवेशांचे वाटप करण्यात येते.
माजलगाव (जि. बीड): जिल्हा परिषद शाळेतील मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, डीआरडीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन गणवेश वाटप करण्यात येतात; परंतु कोरोना महामारीच्या आपत्तीमुळे व शाळा बंद असल्याने यावेळी राज्य शासनाला आर्थिक बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना यावर्षी एकाच गणवेशावर समाधान मानावे लागणार आहे.
प्रतिवर्षी इतर मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल व डीआरडी घटकांतील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दोन गणवेशांचे वाटप करण्यात येते. पहिली ते आठवी वर्गातील मुला-मुलींना हे गणवेश वाटप होते. यावर्षी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २२८ शाळांतील ११ हजार ८६१ विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. यात मुलींना कुठल्याही प्रवर्गाची अट नसल्याने मुलींची सर्वाधिक संख्या ९ हजार १० आहे, तर मुलांची संख्या २ हजार १५१ एवढी आहे. ज्यात मागासवर्गीय मुले-मुली १ हजार ७३७, आर्थिक दुर्बल घटकातील ९६४ व एस.टी. प्रवर्गातील १५० मुलांंना हा लाभ होणार आहे. माजलगाव गट साधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेतील व्यवस्थापन समितीमार्फत लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती येथील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी दिली.
या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश घेण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून, दोन दिवसांत ज्या त्या शाळेच्या खात्यात तो निधी पाठविण्यात येणार असून, शालेय समितीने चांगल्या दर्जाचा गणवेश विद्यार्थ्यांना घेऊन द्यावा, यात कोणी कुचराई करण्याचे काम केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. - लक्ष्मण बेडसकर, गटशिक्षणाधिकारी, माजलगाव