पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दिंद्रुडसह परिसरात समाधानकारक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:22 AM2021-06-29T04:22:54+5:302021-06-29T04:22:54+5:30
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड शिवारासह परिसरात पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाचे आगमन झाले. यामुळे कापूस ...
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड शिवारासह परिसरात पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाचे आगमन झाले. यामुळे कापूस व सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे.
दिंद्रुड, फकीर जवळा शिवारात जवळपास शंभर टक्के पेरणी पंधरा दिवसात उरकली; मात्र सुरुवातीला धो धो पडलेल्या पावसानंतर पंधरा दिवसाचा खंड पडल्याने पिके कोमेजू लागली होती.
पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता व्यक्त होत होती. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले असताना रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने चांगलाच जोर मांडल्याने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त झालेला पहायला मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतात चालू असलेली पाळी, खुरपणीसह आदी कामे जागेवर टाकून शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये धावपळ उडाली आणि मध्येच चालू असलेले काम अर्धवट ठेवून निवारा जवळ करण्यासाठी पळापळ झाली. कापूस, सोयाबीन, बाजरीसह आदी पिके पेरणी, लागवडीनंतर पावसाने दांडी मारल्याने सुकून जाऊ लागली होती.
वरुणराजाच्या आगमनाने सध्या तरी पिके डोलू लागली आहेत. दोन दिवसापासून आभाळ भरून आलेले असताना, रविवारी तब्बल दोन ते अडीच तास विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने शेतात पाणीच पाणी केले. महागा मोलाची बी-बियाणे, रासायनिक खतासह खरेदी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झालेल्या पावसामुळे हास्य फुलले होते. या पावसाच्या जोरदार हजेरीमुळे पिके जोमाने येतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
===Photopath===
280621\sanotsh swami_img-20210627-wa0094_14.jpg