अंबाजोगाई तहसील कार्यालयात निराधारांचा सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:33 PM2019-02-18T16:33:14+5:302019-02-18T16:34:00+5:30
या आंदोलनात वृद्धांच्या विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
अंबाजोगाई (बीड ) : श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनांमध्ये समावेश व्हावा, रेशनवरील धान्य तात्काळ मिळावे, निराधार योजनेचे अर्ज दाखल करतांना अडवणूक होऊ नये. अशा विविध मागण्यांसाठी मानवलोक जनसहयोगच्या वतीने सोमवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निराधारांनी बैठे सत्याग्रह आंदोलन छेडले. या आंदोलनात वृद्धांच्या विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
अंबाजोगाई तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक झाली. मात्र, या बैठकीत कागदपत्रांची त्रुटी दाखवून अनेक निराधारांवर अन्याय झाला आहे. या निराधारांचा या योजनेत समावेश करावा, श्रावणबाळ योजना, संजयगांधी योजना लागू व्हावी, याासाठी २१ हजार रुपयांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळावे. हे प्रमाणपत्र मिळावे म्हणून तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी निराधारांना ते उपलब्ध झाले नाहीत. लाभार्थ्यांचे अनुदान दोन हजार रुपये करण्यात यावे. तहसील कार्यालयाने निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करावी. शिधापत्रिकाधारकांना स्वस्तधान्य दुकानदार धान्य खरेदीसाठी गेल्यास उद्धट वर्तन करतात त्यांच्यावर कारवाई व्हावी, तहसील कार्यालयात रिक्त असलेली नायब तहसीलदारांची पदे तात्काळ भरावीत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी योजना जाहिर करून अन्नपाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. याची दक्षता घ्यावी. तहसील कार्यालयातील दलालांचा सुळसुळाट बंद करावा. अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत शेकडो लाभार्थ्यांची नावे आली आहेत. मात्र, त्यांना धान्य मिळत नाही. त्यांना धान्य तात्काळ उपलब्ध करून द्यावेत. रॉकेल वाटप सुरू करावे, अशा विविध मागण्यांसाठी हा बैठा सत्याग्रह होता. यावेळी वृद्ध निराधारांनी दिलेल्या विविध घोषणांनी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. यावेळी मानवलोक जनसहयोगच्या वतीने नायब तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, प्रा. डॉ. अरूंधती पाटील, शाम सरवदे, संजना आपेट, सावित्री सगरे, धिम्मंत राष्ट्रपाल यांच्यासह वृद्ध व निराधार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
कवितेचे व गीतांच्या माध्यमातून अनेक वृद्धांनी मांडल्या व्यथा
यावेळी झालेल्या बैठा सत्याग्रहात जमलेल्या अनेक वृद्ध निराधार महिलांनी आपल्या गितांमधून व कवितांमधून आपल्या व्यथा मांडल्या.
‘शिकले ते हुकले,
गेले ते वाया,
लाजतो पगारी कराया ''
अशा विविध कविता व गीते या ठिकाणी सादर झाली.