ए वाचवा, वाचवा ना कुणी तरी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:17 AM2018-12-21T00:17:45+5:302018-12-21T00:18:21+5:30
ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी.. हे शब्द आहेत, सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रीचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी.. हे शब्द आहेत, सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रीचे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परीक्षा देऊन परतणाऱ्या सुमितवर प्रेमप्रकरणातून भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे आणि त्याच्या मित्रांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमितला वाचविण्यासाठी भाग्यश्री मदत मागत होती. मात्र, उपस्थितांनी केवळ फोटो आणि व्हिडीओ बनविण्यातच धन्यता मानली. जर सुमितला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असते तर ‘माझं लेकरू वाचलं असतं’ असा टाहो सुमितच्या आईने फोडला. या घटनेवरुन आजही नागरिक गंभीर घटनेत मदतीसाठी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.
सुमित वाघमारे (रा. तालखेड, ता. माजलगाव ह. मु. नागोबा गल्ली, बीड) या युवकाचा बुधवारी सायंकाळी तेलगाव नाक्यावर दोघांनी धारदार शस्त्रांनी वार करुन खून केला होता. त्यानंतर रात्री उशिरा सुमितची पत्नी भाग्यश्री हिच्या फिर्यादीवरुन तिचा भाऊ बालाजी लांडगे व त्याचा मित्र संकेत वाघ विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत आरोपींना अटक झालेली नव्हती.
खून झाला त्यावेळी सुमित हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. सुमित खाली कोसळल्यानंतर लोकांनी गर्दी केली. भाग्यश्री त्याच्या अंगावर पडून ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी... असा हंबरडा फोडत मदत मागत होती. मात्र, कोणीही पुढे आले नाही. याचा अनेकांनी व्हिडीओ बनविला, तर काहींनी फोटो काढले. अखेर चौघांनी एका रिक्षाचालकाला विनंती करीत सुमितला जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तेथे भाग्यश्रीसह सुमितच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.
नातेवाईकांनी मांडली एसपींपुढे कैफियत
आरोपींना अटक करुन त्यांना कडक शिक्षा करा या मागणीसाठी गुरुवारी सकाळीच भाग्यश्रीसह नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी कार्यालय परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता.
आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांनी बजावली होती नोटीस
२५ आॅक्टोबर रोजी भाग्यश्री घरातून निघून गेल्यावर तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून मिसींग तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली.
त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी भाग्यश्री व सुमित दोघेही स्वत:हुन ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी आपण स्वखुशीने लग्न केल्याचे कबुली देत सर्व कागदपत्रे पोलिसांना दिली.
यावेळी भाग्यश्रीने आपले वडील व आत्या यांच्यापासून जिवाला धोका असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
दोघांनाही कलम १४९ नुसार नोटीस बजावली होती. या तक्रारीत बालाजी लांडगेचे नाव नव्हते, असे पोलीस सूत्रांकडून समजते.