आणखी एका पतसंस्थेत घोटाळा; माजलगावच्या 'हिंदवी स्वराज्य'च्या अध्यक्षासह २० जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 05:24 PM2024-11-30T17:24:18+5:302024-11-30T17:24:34+5:30
ठेवींचा गैरवापर करून तब्बल १ कोटी ८ लाख ३६ हजार ८१० रुपयांचा अपहार लेखापरीक्षणात उघड
माजलगाव ( बीड) : ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या ठेवींच्या गैरवापर करून बनावट फाईल तयार करून बोगस कर्ज, बोगस सोनेतारण, बोगस नोंदी व हातावर रक्कम ठेवून १ कोटी ८ लाख ३६ हजार ८१० रुपयांच्या फसवणूक, अपहार केल्या प्रकरणी येथील हिंदवी स्वराज्य पतसंस्थेचा अध्यक्ष रमेश किसन वामन, सचिव महानंदा सखाराम मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सखाराम मोरे यांच्यासह दहा संचालक, दहा कर्मचारी अशा २० जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शासनाचे सहकारी लेखापरीक्षक यशवंत बन्सीधर शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव शहरातील धारुर रोडवरील एलआयसी ऑफिसच्यावर मागील अनेक वर्षापासून हिंदवी स्वराज्य पतसंस्था कार्यरत आहे. या ठिकाणी मागील एक वर्षभरात ठेवीदारांना आपल्या ठेवी परत न मिळाल्याने त्यांनी जिल्हा निबंधकांकडे या संस्थेविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या त्या अनुषंगाने शासनाचे लेखापरीक्षक यशवंत बन्सीधर शिंदे यांनी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २४ या कालावधीत या संस्थेचे लेखापरीक्षण केले. या लेखापरीक्षणात संस्थेने कमाल रोख मर्यादेचे उल्लंघन केल्याचे आढळून आले तसेच हातावर रक्कम ठेवून अपहार केला तसेच बनावट कर्ज प्रकरण, सोने तारण कर्जवाटप करून ते तिजोरीत न ठेवता सदरील रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले.
एकूण १ कोटी ८ लाखांचा अपहार
या पद्धतीने रोख शिल्लक १५ लाख रुपये, बोगस नोंदी ५० लाख रुपये, बोगस कर्ज १२ लाख ४४ हजार रुपये असे मिळून एकूण एक कोटी आठ लाख ३६ हजार ८१० रुपयांचा अपहार झाल्याचे लेखपरीक्षणात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश वामन, सचिव महानंदा सखाराम मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सखाराम मोरे यांच्यासह संस्थेतील कर्मचारी अजय नारायण नाईकनवरे, ताराचंद शाम बोले, भागवत अशोक गरड, गणेश माणिक वेळवे, अमर लहू देवकते, शुभम संजय गोपाळ, भागवत राजेभाऊ कुटे ,नरेंद्र राजेंद्र माधवे, भाग्यश्री रमेश वामन, वैष्णवी सुरेश मोरे, कमलाकर बाबासाहेब उंबरे, तेजस प्रकाश महाजन, सत्यभामा पांडुरंग पाष्टे, सुरेश चंद्र सुधाकर निळगे, मंगल श्याम बोले, अमोल लहू देवकते, आनंद निवृत्ती सरवदे, पवन मुरलीधर पदमगीरवार, प्रदीप मारुती गांजकर, प्रसाद प्रभाकर वंजारे या सर्वांनी मिळून संगनमताने संस्थेच्या रकमेच्या अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात लेखापरीक्षक शिंदे यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.